पुणे महापालिकेत 220 लिपिक तर 140 अभियंत्यांची भरती | पुढारी

पुणे महापालिकेत 220 लिपिक तर 140 अभियंत्यांची भरती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिकेत लिपिक (क्लर्क) या पदाच्या 220 इतक्या सर्वाधिक पदांची, तर त्यापाठोपाठ 140 कनिष्ट अभियंता अशा विविध पदांच्या तब्बल 506 जागांची भरती होणार आहे. या सर्व भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असून, येत्या दोन दिवसांत भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली 2014 मध्ये राज्य शासनाने मंजूर केली. त्यानुसार नव्या पदांची निर्मिती झाली आहे.

मात्र, कायम सेवा भरतीवर राज्य शासनाने घातलेल्या बंदीमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या जवळपास दहा हजारांवर गेली आहे. आता ही बंदी शासनाने उठविल्याने महापालिकेने अत्यावश्यक सेवांमधील कायमस्वरूपी कर्मचार्‍यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रोस्टर तपासणीचे काम पूर्ण झाले असून, कोणत्या पदांची आणि किती जागांची भरती करायची, यासंबंधीची निश्चिती झालीPMC Job

आहे.

त्यानुसार सर्वाधिक 220 इतकी लिपिकपदांची भरती होणार असून, त्या खालोखाल कनिष्ठ अभियंता 140, सहायक अतिक्रमण निरीक्षक 125, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 9, कनिष्ठ अभियंता वाहतूक 7 आणि सहायक विधी अधिकारी 5 अशी एकूण 506 पदांची भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएम या कंपनीला काम देण्यात आले असून, पुण्यासह अन्य शहरातही या परीक्षेसाठी केंद्र करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात भरती प्रक्रिया सुरू होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

अशी होणार भरती
पदे                                  संख्या
लिपिक                             220
कनिष्ठ अभियंता                140
अतिक्रमण निरीक्षक           125
कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल  09
कनिष्ठ अभियंता वाहतूक      07
सहायक विधी अधिकारी      05

 

Back to top button