खेड शिवापूर : शिवगंगा नदी दुथडी भरून | पुढारी

खेड शिवापूर : शिवगंगा नदी दुथडी भरून

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भोर तालुक्याला जोडणारी शिवगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे शिवापूर (ता. हवेली) ते कुसगाव (ता. भोर) या गावाला जोडणार्‍या पुलावरून पाणी जाऊ नये, यासाठी शिवापूर (ता. हवेली) येथील बंधार्‍याचे सर्व ढापे काढण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग पुढे सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठी कोणीही जाऊ नये, असा इशारा राजगड पोलिसांकडून देण्यात आला आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी याच शिवगंगा नदीमध्ये पाण्याचा फक्त मृतसाठा शिल्लक होता. त्यामुळे अवघा शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. अवघ्या दीड महिन्यानंतर जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे याच नदीला पुराचे स्वरूप आले आहे. नदीकाठी भागातील अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी आहेत. त्या शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, नदीशेजारील शेतकर्‍यांनी शेतात काम करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन राजगड पोलिसांनी केले आहे.

या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलावर पाणी असेल तर त्यावरून कोणीही जाऊ नये. काही अडचण आल्यास त्वरित पोलिस पाटील व राजगड पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांना त्वरित मदत करण्यात येईल, असे राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील व सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी सांगितले.

Back to top button