पुणे : धूरनळी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी | पुढारी

पुणे : धूरनळी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

ओतूर : बाप्पू रसाळे : कल्याण- नगर महामार्गावरील माळशेज घाट निसर्गरम्य वातावरणाने फुलला असून संपूर्ण राज्यभरातून पर्यटक येथे दरवर्षी आनंद लुटण्यासाठी येत असतात. त्याशिवाय जुन्नर तालुक्यात अनेक विविध पर्यटनस्थळे असून ओतूर येथून काही अंतरावरच मुंजाबाचा डोंगर व तेथील धूरनळीचा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.

ओतूरजवळील अहमदनगर-कल्याण महामार्गापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर अत्यंत निसर्गरम्य वातावरणात खळखळणार्‍या ऐतिहासिक मुंजोबा डोंगराच्या धूरनळी धबधब्याची पर्यटकांना कमालीची भुरळ पडत आहे. निसर्गाचा खरा अविष्कार असणारा हा धबधबा पावसाला सुरुवात झाली की कड्याच्या उंचावरून खाली झेपावतो. त्यात चिंब भिजण्यासाठी व या मनोहारी नयनरम्य दृश्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करीत असतात.

याच डोंगरात एका कपारीत पुरातन मुंजाचे शिवमंदिर आहे. येथे दर्शनलाभ घेणारे पर्यटकदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. डोंगराच्या कुशीतून हिरवीगार वनराई व हिरवळीतून धबधब्याचे खळखळणारे पाणी आपला सौंदर्यपूर्ण मार्ग काढीत 24 तास वाहते. निसर्गप्रेमी, युवक, युवती, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लोंढे पर्यटनासाठी धूरनळी धबधब्याला पसंती देतात. येथे मिळणार्‍या रान भाज्या व जवळच्या तलावातील मासे मत्स्यप्रेमींची भूक भागवतात. अगदीच गावरान जेवणाचाही येथे आस्वाद घेता येतो. येथील खेकडा उत्पादन सर्वज्ञात आहे. येथे एका बचत गटाने गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी व्यवस्था केली असल्याने ही ट्रिप परिपूर्ण होण्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल. अशा या धूरनळी आणि परिसराचं सौंदर्य अनुभवण्यासाठी सध्याच्या काळात पर्यटकांची मोठी रीघ लागताना दिसत आहे.

का म्हणतात धूरनळी?

उंच कड्यावरून धबधबा कोसळत असताना वादळी हवेने त्याचे तुषार जणू दुरून अग्निधुरासारखे भासतात. नळीतून वाहणारा हा धबधबा लांबून बघताना धुरासारखा दिसत असल्याने त्याला “धूरनळी” असे संबोधले आहे.

Back to top button