चिंता मिटली! कळमोडी धरण शंभर टक्के भरले; मागील वर्षीपेक्षा महिनाभर आधीच गाठला टप्पा | पुढारी

चिंता मिटली! कळमोडी धरण शंभर टक्के भरले; मागील वर्षीपेक्षा महिनाभर आधीच गाठला टप्पा

वाडा, पुढारी वृत्तसेवा: कळमोडी (ता. खेड) गावाच्या पश्चिमेस आरळा नदीवर असणारे कळमोडी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी हे धरण १२ ऑगस्टला भरले होते. यंदा मात्र महिनाभर आधीच भरले आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आरळा नदीवरील कळमोडी धरण रविवारी १० जुलै रोजी शंभर टक्के भरले आहे. सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात प्रथम शंभर टक्के धरण भरण्याचा मान यंदाही कळमोडीने पटकावला आहे. खेड तालुक्यातील गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगांव पठार भागाची चिंता आता बऱ्याच अंंशी मिटली आहे.

धरणात २०१० पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नसून धरण भरताच सांडव्यावरून पाणी वाहण्यास सूरुवात होते. सध्या धरणात २.६७ द.ल.घ.मी. म्हणजेच १.५४ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात एक जुनपासून ५५२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजुनही संततधार सुरू आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चासकमान धरणात येत असल्याने चासकमान धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे.

Back to top button