ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी! | पुढारी

ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी!

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: वडगाव शेरी मतदारसंघात भामा आसखेडचे पाणी आल्याने टँकरची संख्या कमी होईल अशी शक्यता होती. मात्र ऐन पावसाळ्यातदेखील 50 लाख रुपयांची निविदा उघडण्यात आली आहे. ही निविदा आपल्यालाच मिळावी यासाठी टँकर चालकांमध्ये स्पर्धा होती. त्यामुळे 38 टक्के कमी दराने आलेली निविदा पाणीपुरवठा विभागाने मंजूर केली आहे. वडगाव शेरी टँकर केंद्रावरून ठेकेदारासह महापालिकेचे टँकर भरले जातात. या ठिकाणाहून पाणी मिळत नसलेल्या भागाला टँकरद्वारे पाणी पुरविले जाते. दोन वर्षापूर्वी भामा आसखेड योजनेचा मोठा गाजावाजा झाला होता.

या योजनेचे पाणी आल्यानंतर वडगाव शेरी मतदारसंघ टँकरमुक्त होईल, असा आभास राजकारणी मंडळींनी तयार केला होता. मात्र असे असले तरी अद्याप काही भागाला पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. पावसाळा सुरू होऊनदेखील पाणी टँकरद्वारे पूरविण्याच्या निविदा निघत असल्याने पाणी प्रश्न किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. याबाबत कनिष्ठ अभियंता अजय मोरे म्हणाले, की 38 टक्के कमी दराने आलेल्या एजन्सीची निविदा मंजूर केली आहे. पाणीपुरवठा होत नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा करावा लागत असल्याने निविदा काढण्यात आली.

Back to top button