पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी (१९ मे) पहाटे आलिशान पोर्शे कारने दिलेल्या भीषण धडकेत अश्विनी कोष्टा या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मूळची जबलपूरमधील असणारी अश्विनी पुणे येथे आयटी इंजिनिअर हाेती. या प्रकरणातील दाेषींवर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी तिचे वडील सुरेश कोष्टा यांनी केली आहे.
'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना सुरेश कोष्टा यांनी सांगितले की, या अपघाताला कारणीभूत असणार्या आरोपींवर अशी कारवाई करा की, यातून अशा प्रकारचे वर्तन करणार्यांना एक प्रकारचा धडाच मिळेल. माझ्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. आम्ही आमच्या मुलांना १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत कार चालविण्यास दिली नव्हती, असे सांगत त्यांनी या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या पालकांवरही तीव्र संताप व्यक्त केला.
रविवार १९ मे रोजी पहाटे पुणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाची पोर्शे कार चालविणार्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याने आयटी इंजिनिअर असलेल्या तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचालक अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने १५ तासांत जामीन मंजूर केला. बाल न्याय मंडळाने अल्पवयीन मुलाला रस्ता अपघातांवर निबंध लिहून 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता.
कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार अपघाताच्या (Pune Porsche Car Accident) घटनेनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. या अपघातातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून अग्रवाल फरार होते. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अपघाताच्या रात्री अल्पवयीन मुलाला दारू पिण्यास देणारा बार मालक आणि बार मॅनेजरलादेखील पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
आयटी अभियंता तरुण- तरुणीच्या अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिसांनी कुठलीही नरमाईची भूमिका घेतलेली नाही. आरोपी अल्पवयीन असल्याने यापेक्षा वेगळी कायदेशीर भूमिका घेण्यास काही मर्यादा आल्या. जर कोणी यापेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकतो आणि पुणे पोलिसांनी घेतली नाही, असे दाखवून दिले, तर जनतेची जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सोमवारी (दि.२०) पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले होते.