‘पाटबंधारे’ला हवा जागांचा ताबा; पाणी उचलणार्‍या जागांसाठी जलसंपदाकडे मागणी | पुढारी

‘पाटबंधारे’ला हवा जागांचा ताबा; पाणी उचलणार्‍या जागांसाठी जलसंपदाकडे मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘खडकवासला धरणातून महापालिका जे पाणी घेते, त्या सर्व पाणी उचलणार्‍या जागांचे (उद्भव) नियंत्रण आम्हास देण्यात यावे,’ अशी मागणी पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाकडे केली आहे. पाटबंधारे विभागाकडून जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रातून हा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेला हे पत्र पाठविण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या मापदंडानुसार 10.90 टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात पालिकेने तब्बल 20.24 टीएमसी पाणी उचलले आहे.

महापालिकेला मंजूर असलेल्या कोट्यापेक्षा 9.34 टीएमसी जादा पाणी उचलण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाकडून वर्षभर महापालिकेस पाणी वापर नियंत्रित करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी सिंचनासाठी आणि उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी टंचाई होती. हे रोखण्यासाठी महापालिका खडकवासला धरणातून महापालिका जे स्त्रोतांमधून पाणी घेते.

त्यासर्व जागांचे नियंत्रण पाटबंधारे विभागाकडे दिल्यास पालिकेच्या पाणी वापरावर नियंत्रण आणता येईल, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्षात असे अधिकार पाटबंधारे विभागाला मिळाल्यास महापालिकेच्या पाणी घेण्याच्या सर्व अधिकारांवर गदा येणार आहे. दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारे महापालिका जादा पाणी उचलत असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पोलिस बंदोबस्तात हे पंप बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून गदारोळ उडाला होता.

हेही वाचा

माजी ‘आयपीएस’ला न्यायालयाने फटकारले; जर्मन बेकरी बॉम्बस्फोट तपास प्रकरण

उतरणीला लागलेली शिवसेना खरेच संपेल?

पुण्याला दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा; कोकण, कोल्हापूरलाही रेड अलर्ट

Back to top button