माजी ‘आयपीएस’ला न्यायालयाने फटकारले; जर्मन बेकरी बॉम्बस्फोट तपास प्रकरण | पुढारी

माजी ‘आयपीएस’ला न्यायालयाने फटकारले; जर्मन बेकरी बॉम्बस्फोट तपास प्रकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याच्या मागणीसाठी हस्तक्षेप अर्ज दाखल करणे हे आक्षेपार्ह आहे. ही कृती न्यायव्यवस्थेच्या कामकाजात ढवळाढवळ केल्याबद्दल न्यायालयाचा अवमान करणारी ठरू शकते,’ अशा कठोर शब्दांत एका माजी आयपीएस अधिकार्‍याला न्यायालयाने फटकारले. अर्जदार अधिकार्‍याला समज देत न्यायालयाने त्याचा अर्ज बुधवारी दफ्तरी दाखल केला. या खटल्याची विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

‘राष्ट्रीय सुरक्षेशीसंबंधित खटल्यात एखादी व्यक्ती आपल्याकडे काही साहित्य असल्याचा, तसेच फिर्यादी पक्ष (सरकार) अकार्यक्षम असल्याचा दावा करत हस्तक्षेप करत असेल, तर ती न्यायव्यवस्थेत अनुचित ढवळाढवळ आहे. एखाद्या नागरिकाकडे महत्त्वाचे साहित्य असेल, त्यामुळे खटल्यात मदत होईल, असे त्याचे म्हणणे असेल, तर त्याला तपास यंत्रणा किंवा फिर्यादींकडे जाण्याचे स्वातंत्र्य आहे. तो थेट न्यायालयात येऊन सुनावणीला प्रभावित करू शकत नाही. कायद्याच्या तरतुदींचे पालन करत, तसेच सरकारी व बचाव पक्षाला पूर्ण संधी देत खटल्याची सुनावणी घेतली जात असताना, अशा प्रकारे अर्ज दाखल करणे आक्षेपार्ह असून, न्यायव्यवस्थेच्या कामकाजात गंभीर ढवळाढवळ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही,’ अशी टिप्पणी न्यायालयाने यावेळी केली.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या तपास प्रक्रियेत उणिवा असल्याचा दावा करत या माजी आयपीएस अधिकार्‍याने न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. पुणे शहराला हादरविणार्‍या या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाच्या प्रक्रियेत वगळलेली महत्त्वाची वस्तुस्थिती मांडण्याची व त्या आधारे पुन्हा तपास करण्यास आदेश देण्याची मागणी या अर्जात करण्यात आली होती. विशेष म्हणजे या आयपीएस अधिकार्‍याने वर्षभरापूर्वीही याच मागणीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी न्यायालयाने या अधिकार्‍याला तपास यंत्रणांकडे जाण्याची सूचना केली होती. या संदर्भातील कायद्यातील तरतुदीही न्यायालयाने स्पष्ट केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या अधिकार्‍याने हस्तक्षेप अर्ज दाखल केला.

Back to top button