पुण्याला दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा; कोकण, कोल्हापूरलाही रेड अलर्ट | पुढारी

पुण्याला दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा; कोकण, कोल्हापूरलाही रेड अलर्ट

पुणे : हवामान विभागाने पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि घाटमाथ्यासह संपूर्ण जिल्ह्याला आज आणि उद्या (शुक्रवारी आणि शनिवारी) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकणासह कोल्हापूर भागातही रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यात दमदार पाऊस
सुरूच आहे. पुणे वेधशाळेतील अतिरिक्त महासंचालक डॉ.कृष्णानंद होसाळीकर यांनी स्वतः टि्वटरद्वारे पुणेकरांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रेड अ‍ॅलर्ट म्हणजे किमान 200 मिलिमिटर इतका पाऊस होऊ शकतो.

पुण्यात दि. 8 आणि 9 रोजी, तर कोकणसह मध्यमहाराष्ट्रात 11 जुलै पर्यत अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आजही कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. भारतात अहमदाबाद, गुना, गोपाळपुर भागावरही तीव्र कमी दाबाचा पट्टा तायर झाला आहे. बंगालचा उपसागर व ओडिशा,महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी या भागातही कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने राज्यात पाऊस आणखी वाढणार आहे.

रेड अलर्ट
कोल्हापूर (8), पालघर (9 व 10), ठाणे (8), मुंबई (8), रायगड (8 व 9), रत्नागिरी (8 व 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8 व 9), सातारा (8 व 9).

ऑरेंज अलर्ट
पालघर (9 ते 11), ठाणे (9 ते 11), मुंबई (9 ते 11), रायगड (10 व 11), रत्नागिरी (9 ते 11), सिंधुदुर्ग (9 ते 11), नाशिक ( 8), पुणे (10 व 11), कोल्हापूर (9 ते 11), सातारा (10 व 11), चंद्रपूर (8).

यलो अलर्ट
जळगाव (8), जालना (8), परभणी, हिंगोली, लातूर (8), नंदुरबार, धुळे (8), नागपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली (8 ते 11).

पुणे शहराला 7 व 8 रोजी अतिमुसळधारेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना सावधानता बाळगावी. दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असून पुढील चार-पाच दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.

                     -डॉ.कृष्णानंद होसाळीकर,अतिरिक्त महासंचालक, पुणे वेधशाळा

 

Back to top button