राखेचे करायचे काय? स्मशानभूमीतील समस्यांबाबत ‘पर्यावरण’कडे विचारणा | पुढारी

राखेचे करायचे काय? स्मशानभूमीतील समस्यांबाबत ‘पर्यावरण’कडे विचारणा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: स्मशानभूमीतील शेडमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर निर्माण होणार्‍या राखेचे करायचे काय, अशी विचारणा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. याबाबत पर्यावरण विभागाकडे मार्गदर्शन करण्याची विनंतीही केली आहे.
दुसरीकडे शहरातील प्रमुख स्मशानभूमी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमितील राख मात्र आंबिल ओढ्यातून थेट नदीपात्रात टाकली जात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी स्मशानभूमी, दफनभूमीची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीमध्ये आणि नव्याने समावेश झालेल्या गावांमध्ये 121 ठिकाणी अंत्यसंस्काराची व्यवस्था आहे.

यामध्ये शेड दाहिनी, विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी, डिझेल दाहिनी आणि ऐअर पोल्युशन सिस्टीम आदींचा समावेश आहे. दररोज 250 ते 300 मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था महापालिका हद्दीमध्ये आहे. नव्याने 19 स्मशानभूमी आणि 21 दफनभूमी महापालिकेने प्रस्तावित केल्या असून, 2022-23 च्या अंदाजपत्रकात यासाठी 17 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहराचा सध्याचा मृत्यू दर हजारी 7.6 आहे. शेडमध्ये लाकूड व गोवर्‍यांमध्ये एक मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. सध्याची शेडची संख्या विचारात घेता प्रतिदिन सरासरी 90 मृतदेहांचे दहन केले जाते.

दरम्यान, शेडमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर निर्माण होणार्‍या राखेतून नातेवाईक थोडी राख घेऊन जातात. त्यानंतर शिल्लक राहिलेली राख स्मशानभूमी प्रशासनाकडून नदीपात्रात किंवा ओढ्याच्या पात्रात टाकली जात असे. मात्र, ही राख जलस्त्रोतांमध्ये टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यातच कैलास स्मशानभूमीतून नदीपात्राकडे जाणारे गेट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर निर्माण होणारी राख एका ठिकाणी साठवून ठेवली जात आहे. या राखेचे काय करायचे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पर्यावरण विभागाला पत्र पाठवून या राखेचे काय करायचे, अशी विचारणा केली आहे. या राखेची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ
वैकुंठ स्मशानभूमीत दिवसाला, महिन्याला किती मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. शेडमध्ये अंत्यसंस्कार होणार्‍या मृतदेहांची संख्या किती आहे, त्यातून महिन्याला किती राख निर्माण होते, त्या राखेची विल्लेवाट कशी लावली जाते, असे प्रश्न तेथील अधिकार्‍यांना विचारल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठांकडून माहिती घेण्यास सांगण्यात आले.

‘वैकुंठ’तील रक्षा आंबिल ओढ्यातून थेट नदीत
शहरातील महत्त्वाची व प्रमुख स्मशानभूमी म्हणून वैकुंठ स्मशानभूमी ओळखली जाते. अनेकवेळी उपनगरांमधूनही अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीत आणले जातात. या ठिकाणी विद्युत, गॅस, डिझेल दाहिनीसह शेडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या शेडमध्ये अंतिम संस्कार केल्यानंतर निर्माण होणारी राख स्मशानभूमीच्या पाठी आंबिल ओढ्यामध्ये टाकली जाते. यासाठी या ठिकाणी रॅम्प बांधण्यात आला असून, राख वाहण्यासाठी हातगाडींचीही व्यवस्था आहे.

Back to top button