तळेगावातील रोडरोमिओंना आवरा | पुढारी

तळेगावातील रोडरोमिओंना आवरा

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) या मोठ्या गावात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये आहेत. शाळा सुटल्यानंतर आणि भरायच्या अगोदर रोडरोमिओंनी रस्त्यावर उच्छाद मांडला असून, यांना कोणीतरी आवरा, असे म्हणण्याची वेळ सुजाण नागरिकांवर आली आहे.

रोडरोमिओ हे जास्त करून शाळा आणि विद्यालय सुटल्यानंतर रस्त्यावरून जात असताना गाडी जोरात पळवून, हॉर्न दाबून धरून कर्णकर्कश आवाज करतात. बर्‍याच वर्षांनी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ताही चकाचक असल्याने गाडी दामटायचा आनंद काही जण लुटत आहेत.

परिसरात अनेक दिवस झाले हा धुमाकूळ सुरू आहे. या रोडरोमिओंच्या वाढत्या उपद्रवामुळे काही विद्यार्थिनींना शिक्षण सोडून घरी बसण्याची शक्यता आहे. या धुमाकूळ घालणार्‍या रोडरोमिओंना वरदहस्त कोणाचा? हा प्रश्न सुटला नाही. तळेगाव ढमढेरे ते माळीमळा या रस्त्यावर टेस्ट ड्राइव्ह घेतल्यासारख्या फेर्‍या अतिशय वेगाने गाड्या सुटतात. शाळा सुटल्यानंतर मुले घरी जाताना अपघात होण्याची शक्यता आहे.

तसेच काही अल्पवयीन विद्यार्थ्यांकडे गाडी चालविण्याचा परवाना नाही. प्रशासन विद्यार्थ्यांची आणि पालकांची फरपट पाहून विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना विचारत नाही. परंतु, काही जण एका गाडीवर चार-चार जण बसून मोठ्ठा हॉर्नचा आवाज करून मुद्दाम आवाजाचे प्रदूषण किंवा गाडी जोरात पळवून, कर्णकर्कश आवाज करून परिसरात दहशत माजवतात. मुलींना पाहून जोरात गाडी पळविणे, असे प्रकार आता वाढीस लागले आहेत. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Back to top button