आडसाली उसाच्या लागणी खोळंबल्या; कळस परिसरात पावसाचा पत्ताच नाही | पुढारी

आडसाली उसाच्या लागणी खोळंबल्या; कळस परिसरात पावसाचा पत्ताच नाही

कळस : पुढारी वृत्तसेवा: कळस (ता. इंदापूर) परिसरात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने आडसाली उसाच्या लागणी खोळंबल्या आहेत. साखर कारखान्यांचा नुकताच आडसाली ऊस लागवड हंगाम सुरू झाला आहे. मात्र, परिसरात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने अद्याप ओढे, नाले, छोटे-मोठे बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडे पडले आहेत. विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालावल्याने शेतातील उभ्या पिकांना वेळेवर गरजेनुसार पाणी देणे मुश्किल झाले आहे.

पावसाचा अंदाज येत नसल्याने शेतकरीराजा सध्या पुरता संभ्रमात पडला आहे. दिवसभर आकाशात काळ्या ढगांची गर्दी दाटून येते; मात्र रिमझिम पाऊस वगळता एकदाही दमदार असा समाधानकरक पाऊसच पडत नसल्याने शेतकर्‍यांच्या आशा धुळीस मिळत आहेत. शेतकरी सध्या मोठ्या दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

काही शेतकर्‍यांनी शेती मशागतीची कामे उरकून घेतली असून, शेतात ऊस लागवडीसाठी सर्‍यादेखील सोडल्या आहेत. मात्र पावसाचा पत्ता नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढील 15 दिवस अशीच स्थिती राहिली तर हिरवी शेते पुन्हा काळभोर होतील की काय, याच विवंचनेत शेतकर्‍यांच्या नजरा सद्या दमदार पावसाकडे लागल्या आहेत.

Back to top button