इंदापूरच्या सीएनजी पंपावर वाहकांची गैरसोय | पुढारी

इंदापूरच्या सीएनजी पंपावर वाहकांची गैरसोय

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा: अलीकडील काळात अनेक वाहनधारकांनी सीएनजी गॅसवर चालणार्‍या वाहनांना पसंती दिली असली, तरी हा गॅस भरण्यासाठी इंदापूर येथील सीएनजी पंपावर व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांना तासन् तास रांगेत ताटकळत राहण्याची वेळ येत आहे. यामधून वाहनचालकास त्रास सोसावा लागत आहे. इंदापूरलगत पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी गावच्या हद्दीत सीएनजी पंप कार्यान्वित आहे. पुणे आणि सोलापूर या शहरातून निघणार्‍या सीएनजीधारक वाहनचालकांसाठी हा पंप अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे.

यामुळे या पंपावर वाहनांची सतत वर्दळ असते, परंतु सीएनजी पंपावर कंपनी व्यवस्थापनाकडून योग्य प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत नसल्याने सीएनजी गॅस असतानाही वाहनधारकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. या ठिकाणी सीएनजीचे दोन पॉइंट आहेत; मात्र दोन्हीही पॉइंटवर मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने एकच पॉइंट चालू ठेवला जातो. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून अनेकांना ताटकळत राहावे लागत आहे. तसेच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने याचा परिणाम वाहनांच्या रांगा पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येऊन वाहतुकीलाही अनेक वेळा अडथळा निर्माण होत आहे.

याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे. एकीकडे भारत सरकार डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहारावर भर देत आहे, परंतु इंदापुरातील सीएनजी पंपावर मात्र ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले जाते. यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे तर अनेक वेळा वादाचे प्रसंग घडत आहेत, याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

Back to top button