डिझेल चोरी करणार्‍या ट्रकचालकाला बेड्या | पुढारी

डिझेल चोरी करणार्‍या ट्रकचालकाला बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा: विश्वास संपादन केल्यानंतर मालकाने त्याच्याकडे ट्रक दिला. त्यानंतर तब्बल 20 हजारांचे 200 लिटर डिझेल चालकाने चोरल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात तब्बल महिनाभर फरार असलेल्या चालकाला अहमदनगर येथून बेड्या ठोकल्या.
रवींद्र महादेव खामकर (रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे, मूळ रा. अंबेजोगाई, बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सचिन अशोक लडकत (37, रा. लडकतवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 7 मे रोजी लडकत यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक खामकरला पुणे ते बंगळुरू भंगार वाहतूक करण्यासाठी दिला होता.

या ट्रकमधील तब्बल 200 लिटर डिझेल खामकरने चोरून नंतर विकल्याचा प्रकार लक्षात आला होता. तेव्हापासून त्याचा शोध लोणी काळभोर पोलिस घेत होते. तांत्रिक पद्धतीने त्याचा शोध घेतला जात असताना तो कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू तसेच विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी जाऊन सतत ठिकाणा बदलत होता. त्यामुळे त्याला अटक करण्यास अडचणी येत होत्या. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो अहमदनगर येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलिस नाईक संतोष राठोड, संभाजी दविकर, अंमलदार शैलेश कुदळे यांचे पथक तयार करण्यात आले.

खामकर अहमदनगर येथे असल्याची खबर पक्की झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचार्‍यांनी सापळा रचला. आरोपी हा अहमदनगर येथील सावेडी परिसरातील हॉटेल मातोश्री या ठिकाणी दारू पित बसला असताना पथकाने हॉटेलच्या बाहेर दबा धरून असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने ते डिझेल वेळापूर, मोहुद, अकलूर व भिगवण या ठिकाणी विकल्याचे सांगितले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Back to top button