‘गुंजवणी’च्या जलवाहिनीचे काम सुरू | पुढारी

‘गुंजवणी’च्या जलवाहिनीचे काम सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा: थेट जलवाहिनीतून तब्बल 21 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाद्वारे पाणी देण्याच्या जलसंपदा विभागाच्या महत्त्वाकांक्षी गुंजवणी प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम अनेक अडथळ्यांनंतर सुरू झाले आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिका, कोरोनामध्ये बंद पडलेले काम, अशा विविध समस्यांमधून मार्ग काढत भूमिगत जलवाहिन्या जोडणीच्या कामास सुरूवात झाली आहे. थेट बंद जलवाहिनीतून सिंचनासाठी पाणी शेतकर्‍यांना देण्यासाठी गुंजवणी प्रकल्प उभारला जात आहे. सात किलोमीटर भूमिगत जलवाहिन्यांची जोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित जलवाहिन्या जोडण्याचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू होणार आहे.

शेतकर्‍यांना थेट बंद जलवाहिनीतून सिंचनासाठी पाणी वितरित करणारा गुंजवणी प्रकल्प केंंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप्ड इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार साकारण्यात येत आहे. गुंजवणी प्रकल्पाची क्षमता 4.17 अब्ज घनफूट (टीएमसी) असून, त्याद्वारे भोर, वेल्हा, पुरंदर या तीन तालुक्यांमधील 21 हजार 392 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. वर्षभर 24 तास विजेशिवाय उच्चदाबाने प्रतिशेतकरी सहा एकरी पाणी असा निकष ठरवून पाणी वितरित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे 83.700 कि.मी. लांबीची बंद वाहिनी डावा कालवा आणि 20.378 कि.मी. लांबीचा उजवा कालवा करण्यात येणार आहे.

त्याद्वारे वेल्हे तालुक्यातील 850 हेक्टर, भोरमधील 9535 हेक्टर आणि पुरंदर तालुक्यातील 11 हजार 107 हेक्टर क्षेत्राला सिंचनास लाभ होणार आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी आवश्यक जलवाहिन्या तयार करून त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणण्यात आल्या. तसेच, आराखडयानुसार आतापर्यंत सात कि.मी. भूमिगत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. भूमिगत जलवाहिन्या असल्याने मोठे उत्खनन करावे लागते. पावसाळ्यामुळे हे काम शक्य नसल्याने जलवाहिन्या जोडणीचे काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. तोपर्यंत इतर संबंधित काम सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

Back to top button