पुणे : सातगाव पठार भागातील बटाट्याचे क्षेत्र घटणार | पुढारी

पुणे : सातगाव पठार भागातील बटाट्याचे क्षेत्र घटणार

पेठ, पुढारी वृत्तसेवा: : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागाला बटाट्याचे आगार समजले जाते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बटाटा लागवड या भागात होते. यंदा या भागामध्ये बटाट्याच्या लागवडीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे.

सातगाव पठार भागामध्ये पिकवला जाणारा बटाटा हा प्रामुख्याने बटाट्यावर प्रक्रिया करणार्‍या कंपन्या खरेदी करतात. सातगाव पठार भागातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू असून, पठारावर प्रामुख्याने बटाटा आणि ज्वारी ही पिके घेतली जातात. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक अवकृपेमुळे तसेच खतांच्या वाढलेल्या किमती, बटाटा बेण्याचे वाढलेले भाव, खताच्या वाढलेल्या किमती, मजुरीचे वाढते दर, यांत्रिकीकरणाचा वाढता खर्च व त्या तुलनेत बटाट्याला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला तसेच कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सातगाव पठार भागातील शेतकर्‍यांची भव्य बटाटा परिषद घेत त्यांच्या अडचणींना वाचा फोडली. शेट्टी यांनी बटाटा उत्पादक कंपन्यांना, ‘मनमानी कराल, तर महागात पडेल,’ असा इशारा दिला आहे. चालू वर्षी सातगाव पठार भागामध्ये अनेक शेतकरी बटाटा पीक करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. कारण, गेली तीन वर्षे बटाटा आणि आर्थिक नुकसान हे समीकरण झाले आहे. अनेक शेतकरी कमी भांडवली पीक म्हणजे बटाटा सोडून वाटाणा, सोयाबी, भुईमूग या पिकांकडे वळला आहे. यंदा बटाटा लागवडीमध्ये तीस ते चाळीस टक्के घट होण्याची शक्यता आहे. सातगाव पठार भागात यंदा चांगला पाऊस झालेला नाही. जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे बटाटा पिकाच्या लागवडीमध्ये निश्चितच घट होणार आहे.

गेली दोन ते तीन वर्षे बटाटा पिकामध्ये नुकसान सहन करावे लागले. या वर्षी मी बटाटा पिकाला फाटा देऊन सोयाबीन किंवा वाटाणा पिकाकडे वळणार आहे.

                                                           – मंगेश अशोक रागमहाले, शेतकरी

बटाटा पीक हे भांडवली पीक आहे. बटाट्याला हमीभाव मिळेलच, याची शाश्वती नसल्यामुळे अनेक शेतकरी बटाट्याऐवजी अन्य पीक करण्याच्या मानसिकतेत आहेत.

                                                                         – संजय कराळे, शेतकरी

या पिकाला एकरी 75 हजार रुपये भांडवली खर्च येतो. गेली तीन वर्षे सतत नुकसान झाल्यामुळे शेतकरी एवढा खर्च करू शकत नाही. त्यामुळे तो अन्य पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे सातगाव पठार भागामध्ये बटाट्याच्या लागवडीमध्ये चाळीस टक्के घट येऊ शकते.

                                                           – दिलीप म्हातारबा पवळे, शेतकरी, पेठ

Back to top button