पुणे : नदीखालून वाहिनी; दीड कोटीचा खर्च | पुढारी

पुणे : नदीखालून वाहिनी; दीड कोटीचा खर्च

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खराडी मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी वाहिनीद्वारे नदीखालून बेबी कालव्यात सोडण्यासाठी साधारण दीड कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पात शुध्द केलेले साडेसहा टीएमसी पाणी जलसंपदा विभागास मुंढवा येथील जॅकवेलमधून बेबी कालव्याद्वारे शेतीसाठी दिले जाते.

मात्र, हे पाणी मुंढवा येथे बांधलेल्या बंधार्‍यातून दिले जाते. मात्र, शुध्द पाण्यात प्रदूषित पाणी मिसळत असल्याने शेतीसाठी प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने शेतीवर परिणाम होतो. शिवाय, कालव्यात सोडलेले हे पाणी जमिनीतून पाझरून आसपासच्या जलस्रोतांमध्ये मिसळते. त्यामुळे जलस्रोत प्रदूषित होतात.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. त्यावर प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने खराडी प्रकल्पात शुध्द केलेले पाणी नदीखालून बंद जलवाहिनीमधून बेबी कालव्यात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्च होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

Back to top button