टोमॅटोचे दर निम्म्यावर; प्रतिकिलोस 30 ते 50 रुपये भाव | पुढारी

टोमॅटोचे दर निम्म्यावर; प्रतिकिलोस 30 ते 50 रुपये भाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा: लागवडीसह उत्पादनातही वाढ झाल्याने मार्केट यार्डात टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे टोमॅटोचे मागील दोन ते तीन महिने शंभर रुपये किलोपर्यंत गेलेले दर पन्नास रुपयांपर्यंत खाली आले आहेत. टोमॅटोला सातत्याने मिळणार्‍या कमी दरामुळे शेतकर्‍यांनी पिके काढल्याने मागील दोन ते तीन महिने घाऊक बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली होती. याखेरीज पाण्याअभावी नवीन लागवडी न झाल्याने त्याचा परिणामही बाजारातील आवक रोडावण्यावर झाला होता. याकाळात किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचले होते.

पुण्यातील बाजारपेठेत टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने शेतकर्‍यांनी आपला मोर्चा पुण्याकडील बाजारपेठेकडे वळविला. त्यामुळे टोमॅटोचे दर खाली येण्यास सुरवात झाली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात आवक आता आठ ते दहा हजार पेट्यांवर गेली आहे. त्यात परराज्यातील बाजारपेठांमध्येही टोमॅटोची आवक वाढल्याने पुण्यातून होणारी मागणी घटली. परिणामी, घाऊक बाजारात दहा किलोचे दर दीडशे ते अडीचशे रुपयांवर आल्याची माहिती मार्केट यार्डातील अडते विलास भुजबळ यांनी दिली. तर किरकोळ बाजारात किलोचे दर तीस रुपयांपर्यंत आल्याचे भाजीविक्रेते चरण वणवे यांनी सांगितले.

Back to top button