तळेगाव दाभाडे : पक्ष्यांना मिळाला कृत्रिम घरट्यांचा सहारा | पुढारी

तळेगाव दाभाडे : पक्ष्यांना मिळाला कृत्रिम घरट्यांचा सहारा

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत भूमी या घटकांतर्गत कृत्रिम घरटी तयार करून पक्षी उद्यान तयार करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या घरट्यांमध्ये अनेक पक्ष्यांचा अधिवास लाभला असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यामार्फत राज्यस्तरावरून मागील दोन वर्षांपासून माझी वसुंधरा हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत यासारख्या वेगवेगळ्या स्तरावर हे अभियान राबवले जात आहे. हे अभियान भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या पंचतत्वाशी निगडित असून या माध्यमातून वसुंधरेचे संवर्धन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे.

या पंचतत्त्वावर काम करत असताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत भूमी या घटकांतर्गत कृत्रिम पक्षी घरटी तयार करून पक्षी उद्यान तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या सहा महिन्यांपासून हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी शहरातील पक्षीमित्र अविनाश नागरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

नगर परिषदेमार्फत जैवविविधता पार्क, ऑक्सिजन पार्क व शेळके उद्यान या ठिकाणी कृत्रिम पक्षासाठी घराटी बसविण्यात आली आहेत. या घरट्याचे वेळोवेळी निरीक्षण केले जात आहे. त्यामध्ये मैना, साळुंकी, चिमणी यासारख्या पक्षांनी आपला आदिवास करण्यास सुरुवात केल्याची दिसून आले आहे. विशेष आकर्षण करणारी बाब म्हणजे अतिशय दुर्मिळ असलेला राखी धनेश पक्षाने सुद्धा आपला अधिवास कृत्रिम घरट्यामध्ये केल्याचे निदर्शनास आले आहे.

तरी या पक्षी उद्यानास पक्षी मित्र व नागरिकांनी भेट देऊन पक्षांची किलबिल ऐकण्याची संधी दवडू नये, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे. या पक्षी उद्यान निर्मितीसाठी उद्यान विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन व माजी वसुंधरा अभियान समन्वयक अधिकारी जयंत मदने यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

Back to top button