आली...पीएमपीची बायोसीएनजी; आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते बसचे उद्घाटन | पुढारी

आली...पीएमपीची बायोसीएनजी; आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते बसचे उद्घाटन

पुणे : पुढारी वृत्तसेवा; महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या बाणेर येथील ओल्या कचर्‍यापासून तयार करण्यात आलेल्या बायोसीएनजी गॅसवर आता पीएमपीच्या बस धावणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. ओल्या कचर्‍यापासून ‘सीबीजी’ हे इंधन तयार करण्याचा प्रकल्प सूस रोड, बाणेर येथे उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणार्‍या इंधनापासून पीएमपीच्या बस चालविण्याचा ‘सिटी वेस्ट टू सिटी बस’ हा उपक्रम पुणे महानगरपालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, मे. नोबेल एक्स्चेंज यांच्या संयुक्त संकल्पनेने राबविण्यात येत आहे.

उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, उपायुक्त आशा राऊत आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनरल मॅनेजर रवींद्र के आर व मे. नोबल एक्स्चेंजचे अधिकारी नुरीअल पेझरकर उपस्थित होते. तळेगावजवळील सोमाटणे येथे असलेल्या इंडियन ऑईल रिटेल आउटलेटमध्ये पीएमपीएमएलच्या बस गाड्यांना इंधन दिले जाईल. आजपासून दैनंदिन सुमारे 10-15 बसमध्ये कचर्‍यापासून निर्माण होणारा हा गॅस भरण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने दैनंदिन सुमारे 100 बसची संख्या वाढविली जाणार आहे. याकरिता सद्य:स्थितीत पुणे शहरामध्ये निर्माण होणारा सुमारे 125 मे. टन ओल्या कचर्‍यावर प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात येत असून, प्रकल्पाची 200 मे. टन प्रतिदिन क्षमतावाढ करण्याचे नियोजन आहे.

Back to top button