सैनिकांनो… सांगा, तुम्ही कुणाचे; इच्छुक म्हणतात ‘धनुष्यबाणा’बरोबर; कार्यकर्ते म्हणतात ठाकरेच | पुढारी

सैनिकांनो... सांगा, तुम्ही कुणाचे; इच्छुक म्हणतात ‘धनुष्यबाणा’बरोबर; कार्यकर्ते म्हणतात ठाकरेच

पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर आता पुण्यातील शिवसैनिक शिंदेंना साथ देणार की ठाकरेंना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन इच्छुकांनी ज्याच्या हाती धनुष्यबाण त्याचबरोबर राहण्याचा मानस व्यक्त केला आहे, तर सर्वसामान्य शिवसैनिकांनी मात्र ठाकरेंबरोबरच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपच्या धक्कातंत्राने अनपेक्षितपणे शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. त्यामुळे थेट शिवसैनिकच मुख्यमंत्री झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनदांचे वातावरण आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदेंची निवड मान्य नाही.

त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंना साथ द्यायची की पक्षप्रमुख ठाकरे यांच्या समवेत राहायचे, असा गहन प्रश्न सध्या शिवसैनिकांपुढे उभा राहिला आहे. याबाबत पुण्यातील सेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला असता सध्या तरी शिवसैनिक संभ्रमातच असल्याचे चित्र आहे. मात्र, बहुतांश सैनिकांनी पक्षाबरोबरच म्हणजे ठाकरे यांच्यासमवेतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. शिंदेंबरोबर जाणार असल्याचे थेट सांगण्यास कोणीही पुढे यायला तयार नाही. अनेकांनी सावध पवित्रा घेत शिंदे गटाने शिवसेनेची अधिकृत सूत्रे घेतली आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडे राहिले तर आपल्याला शिंदेंबरोबरच जावे लागेल, असेही शिवसैनिकांकडून सांगण्यात आले.

भाजपचे ना सेलिब्रेशन… ना जल्लोष!
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाऐवजी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे भाजप सत्तेवर येऊनही पुण्यात भाजप कार्यकर्त्यांंकडून ना जल्लोष ना सेलिब्रेशन करण्यात आले. पुण्यात भाजपचे सहा आमदार आहेत. तर महापालिकेत भाजपचीच एकहाती सत्ता आहे. त्यातच फडणवीस यांना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे बुधवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदी फडणवीस यांचीच निवड होणार असल्याचे निश्चित असल्याने भाजप कार्यकर्ते उत्साहात होते. सोशल मीडियावरही ‘ते पुन्हा येत आहेत’ अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात सुरू होत्या.

गुरुवारी सकाळीच पुण्यातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईला रवाना झाले. सायंकाळी फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त येत असल्याने त्यासाठी जल्लोषाची तयारीही सुरू होती. अभिनंदनाचे शेकडो जाहिरात फलक छपाईसाठी गेले होते. मात्र, सायंकाळी अनपेक्षितपणे फडणवीस यांच्याऐवजी शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे वृत्त झळकले, हा धक्का पचवत असतानाच फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे दुसरे वृत्त आले आणि कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळे शुक्रवारी कार्यकर्त्यांकडून ना जल्लोष झाला ना सेलिब्रेशन.

म्हणूनच शिवसैनिकांचा सावध पवित्रा
आगामी काळात म्हणजेच दोन-तीन महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका आहेत. सेनेची मते ही धनुष्यबाणावरच पडतात. त्यामुळे ही निवडणूक लढविताना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण महत्त्वाचे असणार आहे. हे लक्षात घेऊन इच्छुक उमेदवारांनी धनुष्यबाण ज्यांच्याकडे जाईल, त्यांच्यासमवेत जावे लागेल असे स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या त्यागाची नोंद निश्चितपणे इतिहासात होईल. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हटवून भाजप पुन्हा सत्तेवर आला याचा आनंद आम्हाला आहे, त्याचा आनंदोत्सव नक्कीच साजरा केला जाईल.

                                            जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप.

Back to top button