बारामतीत जूनच्या अखेरीस पावसाची हजेरी | पुढारी

बारामतीत जूनच्या अखेरीस पावसाची हजेरी

बारामती : पुढारी वृत्तसेवा: जूनच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (दि. 30) रोजी पावसाने बारामती शहरात दुपारी दोनच्या सुमारास अर्धा तास हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने बारामतीकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून सुटका झाली. बारामती शहरातच पाऊस झाला असला तरीही तालुक्याला मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. तालुक्यात पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अजूनही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले होते. आठवडे बाजाराचा वार असल्याने शहरात मोठी गर्दी होती. दोनच दिवसांपूर्वी शहरात मुक्कामी असलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळाही कोरडाच पुढे गेल्याने वारकरी पांडुरंगाला पावसासाठी साकडे घालत आहेत. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने वन्यप्राण्यांच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न उभा राहिला आहे. याशिवाय शेतीच्या पाण्याची कमतरता जाणवू लागली असल्याने शेतीसह शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यातील उसाचा लागण हंगामा संपला असून खरीपातील पेरण्यांसाठी पावसाची आवश्यकता आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बाजरी, सोयाबीन यांच्यासह तरकारी पिके घेण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत.

Back to top button