कडेपठार मंदिरात गणपूजा; रात्रभर धार्मिक कार्यक्रम | पुढारी

कडेपठार मंदिरात गणपूजा; रात्रभर धार्मिक कार्यक्रम

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा: जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचा गणपूजा उत्सव कडेपठार मंदिरात बुधवारी (दि. 29) साजरा झाला. पूजा, अभिषेक, भांडाराच्या राशी, छबिना आदी धार्मिक विधी पार पडले. आषाढ शुद्ध प्रतिपदेला (बुधवारी) रात्री साडेदहाला जेजुरीच्या कडेपठार गडावर गणपूजा धार्मिक उत्सवाला सुरुवात झाली. देवाचे मानकरी व रामोशी समाजाचे माऊली खोमणे, अशोक खोमणे, अमित वीरकर, विनोद वीरकर, नंदकुमार महाजन यांच्या मानाच्या पूजा झाल्या. मध्यरात्री साडेबाराला गुरव, कोळी, वीर घडशी समाजाच्या वतीने देवाचा छबिना काढला. रात्री 12 ते पहाटे साडेतीनपर्यंत हजारो भाविकांनी स्वयंभू शिवलिंगावर भंडारा अर्पण केला.

शिवलिंगावर भंडा-याच्या राशी उभ्या राहिल्या होत्या. त्यावर फुलांची आकर्षक सजावट केली होती. रात्रभर राज्याच्या विविध भागांतून आलेल्या वाघ्या-मुरुळीचे ताफे व लोककलावंतांनी देवासमोर जागर केला. पहाटे सहा वाजता शिवलिंगावरील भंडार्‍याचे वाटप करून गणपूजा सोहळा संपला. आषाढ शुद्ध प्रतिपदेला गणपूजा उत्सव असतो. मणी आणि मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्री खंडेराय कडेपठारी आले, तेव्हा तेहतीस कोटी देव, गण व ऋषीमुनींनी देवाची पूजा करून पुष्पवृष्टी व भंडारा उधळण केली. ही धार्मिक प्रथा आजही सुरू आहे. नियोजन कडेपठार देवसंस्थानचे विश्वस्त नितीन कदम, वाल्मीक लांघी, योगेश मोरे, पुजारी सेवक वर्गाचे महेश आगलावे, मयूर दीडभाई, जयमल्हार आगलावे आदींनी केले.

Back to top button