दिव्यांगांचे सादरीकरण भावणार; राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत हावभाव | पुढारी

दिव्यांगांचे सादरीकरण भावणार; राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत हावभाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दिव्यांग मुले असली तरी काय झाले, त्यांचा अभिनय थक्क करणारा आहे… ते आपल्या हावभाव, ‘साइन लँग्वेज’ या माध्यमातून नाटकांत सादरीकरण करणार आहेत. ‘हम किसीसे कम नहीं’ हा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे अन् सादरीकरणातही दिसत आहे. राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेनिमित्ताने त्यांच्यात सादरीकरणाचा जोश, आत्मविश्वास अन् उत्साह पाहायला मिळत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणारी तिसर्‍या राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी भरत नाट्य मंदिरात गुरुवारी (दि. 30) होणार आहे. दिव्यांग मुलांनी विशेष तयारी केली आहे.

मुंबईतील रोटरी संस्कारधाम ‘अकादमी फॉर चिल्ड्रेन विथ स्पेशल नीड्स’ यांचे ‘वाचवाल का?’ नाटक सादर होणार असून, विशेष मुलांनी त्यादृष्टीने तयारीही केली आहे. नाटकदिग्दर्शक भरत मोरे म्हणाले, ‘आम्ही मुलांना चित्र काढून दाखवायचो, बारकावे लिहूनही शिकवायचो. त्यादृष्टीने सराव करीत मुले सादरीकरण करीत गेली. मुले खूप चांगला अभिनय करतात. ते विशेष आहेत, हे त्यांना पाहून वाटत नाही.’

नाशिकच्या महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना विद्यालयातील मुले ‘एक पाऊल’ बालनाट्य सादर करणार आहेत. विशेष मुलांनी सादरीकरणासाठी जोशपूर्ण तयारी केली. शिक्षिका नीता घरत म्हणाल्या, ‘बालनाट्य सादर करणार्‍या बहुतांश मुलांना ऐकू येत नाही. पण, त्यांची जिद्द, आत्मविश्वास थक्क करणारा होता. हावभावाने, अभिनयातून सादरीकरण करणार आहेत. मुलांनी खूप मेहनत घेतली आहे.’

मला नाटकात अभिनय करताना खूप आनंद होत आहे. शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने अभिनय शिकवला. सादरीकरण करताना एक जोश आहे, तयारी केली आहे.

                                                           – क्षितिजा भावसार, बालकलाकार

Back to top button