पिंपरी : एका दिवसात 1 हजार 306 हरकती | पुढारी

पिंपरी : एका दिवसात 1 हजार 306 हरकती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील हजारो मतदारांची नावे गायब झाली आहेत. त्या संदर्भात आता गठ्ठयांनी हरकती सादर केल्या जात असून, बुधवारी (दि.29) एका दिवसात तब्बल 1 हजार 306 हरकती सादर झाल्या. हरकती नोंदविण्यासाठी माजी नगरसेवक, इच्छुक व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला आहे.

पालिकेने 46 प्रभागाची प्रारूप मतदार यादी गुरूवारी (दि.23) प्रसिद्ध केली. त्यांनतर त्यावर सूचना व हरकती स्वीकारण्यास पालिकेच्या निवडणूक विभागाने सुरूवात केली. यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांसह, इच्छुक, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेतेमंडळींनी केला आहे.

एकनाथ शिंदे गट गोव्यातून आज मुंबईत येणार; गुवाहाटीतून ‘जय महाराष्ट्र’ म्हणत गाठले गोवा

त्यानुसार हरकतींची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. निवडणूक विभागास बुधवारी (दि.28) 550 पेक्षा अधिक हरकती प्राप्त झाल्या. आज 1 हजार 306 हरकती सादर करण्यात आल्या आहेत. त्यात वैयक्तिक अर्जापेक्षा माजी नगरसेवक व राजकीय पदाधिकार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यांनी हरकतींचे गठ्ठे सादर केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक विभागात सायंकाळपर्यंत गर्दी दिसत होती. अर्ज स्वीकाण्यासाठी व नोंद करण्यासाठी विभागातील कर्मचार्‍यांना रात्री उशीरापर्यंत थांबावे लागत आहे.

हरकती रविवारपर्यंत स्वीकारणार
प्रारूप मतदार यादीसंदर्भात हरकती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तसेच, विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेतेमंडळींनी हरकतीसाठी शुक्रवार (दि.1) पर्यंत असलेली मुदत वाढवून देण्याची मागणी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडे पालिकेने तशी विनंती केली होती. आयोगाने केवळ रविवार (दि.3) पर्यंत हरकती स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.

Back to top button