संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यात प्रवेश | पुढारी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यात प्रवेश

इंदापूर : संत तुकाराम महाराज यांचा लाखो वैष्णवांसह पालखी सोहळ्याने बारामतीकरांचा निरोप घेऊन सायंकाळी इंदापूर तालुक्यात प्रवेश केला. बुधवारी (दि. २९) सकाळी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा बारामती शहरातील ऐतिहासिक अशा शारदा प्रांगण येथून निघाला. ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत मजल दरमजल करत बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात दाखल झाला. दुपारी १२ वाजता काटेवाडी गावात आल्यानंतर येथे गावकर्‍यांनी व परीट समाजाच्या पारंपारिक रीतीरिवाजाप्रमाणे धोतराच्या पायघड्या घालून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. दुपारची विश्रांती झाल्यानंतर तीन वाजता काटेवाडीच्या बस स्थानकासमोर मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले.

जनाई मुक्ताई, सोबत माऊली, नामा तुकोबाची जोड, डोई तुळस ठेवली, भाळी चंदनाचा टिळा, माळ गळ्यात घातली केला विठूचा कल्लोळ, दिंडी पंढरी चालली !! असे अभंग म्हणत तुकोबारायांची पालखी काटेवाडी येथे मेंढ्याच्या पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचली. रिंगणाच्या वेळी टाळ-मृदंगाचा गजर, तुकोबा-माउलींचा नामघोष भाविकांचा उत्स्फूर्त जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात काटेवाडीतील मेंढ्यांचे दुसरे रिंगण डोळ्यांचे पारणे फेडत पार पडले.

त्यानंतर पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात भवानीनगर येथील निरा डावा कालव्यावरील शेरपुल येथे आल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आदी अधिकारी उपस्थित होते. भवानीनगर, सणसर पर्यंतपालखी रथाचे राज्यमंत्री भरणे यांनी सारथ्य केले. पालखी सोहळ्याचा सणसर गावात मुक्कामासाठी विसावला आहे.

Back to top button