अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात करुणा शर्माला अटक; मुंबईहून घेतले ताब्यात | पुढारी

अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात करुणा शर्माला अटक; मुंबईहून घेतले ताब्यात

पुणे : करुणा शर्मा येरवडा पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात आज सकाळी अटक केली आहे. त्या दोघांना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी येरवडा येथे राहणार्‍या एका २३ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिचे पती आणि करुणा शर्मा मुंढे हिच्यावर शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी रात्री येरवडा पोलीस ठाण्याचे एक पथक मुंबईला रवाना झाले होते. त्यांनी आज सकाळी करुणा शर्मा मुंढे आणि फिर्यादीचा पती यांना मुंबईतील घरातून ताब्यात घेऊन पुण्यात आणले आहे. दोघांना अटक करुन आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे उस्मानाबाद येथे वास्तव्यास होते. त्यांना एक मुलगी आहे. नोव्हेबर 2021 मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा हिच्याबरोबर झाली. ती स्वत:ची ओळख करुणा मुंढे अशी करुन देते.

त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. सतत करुणा शर्मा हिच्याशी बोलत असत. तिने विचारणा केल्यावर तो त्यांचा छळ करु लागला. मी करुणाबरोबर लग्न करणार आहे. तू मला घटस्फोट दे, असे सांगून फिर्यादीला त्यांच्या आईच्या घरी सोडले. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांच्या घरी येऊन फिर्यादीवर पतीने बळजबरी केली. २४ एप्रिल रोजी तिला कार्यक्रमाला जायचे असे सांगून भोसरीला नेले. तेथे करुणा शर्मा हिने हॉकी स्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. पतीच्या शोधासाठी त्या ३ जून रोजी मुंबईतील सांताक्रुझ येथील ग्रीन इमारतीत करुणा शर्मा हिच्या घरी केले. तेथे तिच्या पतीने करुणा शर्मा हिला फोन लावला. तिने जातीवाचक शिवीगाळ करुन पतीला घटस्फोट दे, नाही तर जीव गमवावा लागेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव तपास करीत आहेत.

Back to top button