कांदा, बटाट्याची आवक कमी तरीही दर स्थिर | पुढारी

कांदा, बटाट्याची आवक कमी तरीही दर स्थिर

पिंपरी : जून महिना अर्धा संपत आला तरी पावसाने अद्याप सुरुवात न दिल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. भाज्यांची अवाक कमी झाल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. पालेभाज्यांचे दर वाढत असून भाज्यांच्या खरेदीवर परिणाम होत आहे. पालेभाज्या आणि फळभाज्या महाग आहेत. पिंपरी येथील भाजी मंडई आणि मोशी उपबाजार समितीमध्ये कांदा, बटाटा आवक कमी असून देखील दर स्थिर आहेत.

एप्रिल आणि मे महिना लिंबूने भरपूर भाव खाल्ला होता. आता भाव कमी झाले तरी ग्राहकांकडून लिंब खरेदी कमी झाली असल्याचे दिसून आले. कांद्याची आवक 264 तर बटाट्याची आवक 454 क्विंटल झाली आहे. लिंबांची मात्र 19 क्विंटल आवक झाली. टोमॅटोची आवक 246 तर काकडीची 118 क्विंटल आवक झाली आहे. 35 ते 40 रुपये किलो काकडीला भाव होता. फळांना वाढती मागणी असल्याने सफरचंद, संत्र, अलुबुखार या फळांना ग्राहकांकडून मागणी होती. फळांचे भाव स्थिर असल्याने ग्राहक समाधानी आहेत.

पाऊस आणि भाजलेले कणीस हे सर्वांच्या आवडीचे असते. बाजारात गावरान कणसांची आवक झाली असून ग्राहक कणसाची खरेदी करत आहेत. जून महिना सुरू झाल्याने बाजारात मक्याच्या कणसांची आवक वाढली आहे. जून महिना अर्धा संपला की बाजारात गावरान कणीस येतात. नऊशे ते हजार क्विंटल मका पुणे कृषी बाजारात आला असून पुण्यातून पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाला आहे.

पावसाळा हा पांढर्‍या कणसाचा मुख्य हंगाम असल्याने या काळात पांढरी गावरान मक्याची कणसे बाजारात येत आहेत. पावसाळ्यात या गावरान पांढर्‍या कणसाचा आस्वाद सगळ्यांना घेता येणार आहे. फळ बाजारात जुन्नर, आंबेगाव, नाशिक, सासवड येथून मक्याच्या कणसांची आवक होते. गावरान कणीस फक्त पावसाळ्यातच बाजारात येते. याची चवही वेगळीच असते. त्यामुळे या काळात त्याला जास्त मागणी असते. 40 ते 50 किलोच्या गोणीत ही कणसे येतात. सध्या 40 किलोच्या गोणीसाठी 350 ते 500 रुपये दर आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात पाच किंवा दहा रुपयांना एक कणीस या दराने मिळत आहेत. शेतकरी हरभरा, ऊस यांच्या मध्ये आंतर पीक म्हणून या गावठी कणसाची लागवड करतात. त्यामुळे वर्षातून एकदा पावसाळ्यात हे पांढरा कणीस पाहायला मिळतात.

पावसाळी फळांना मागणी

पावसाळी हंगामातील फळांची बाजारात आवक झाली असून फळांना ग्राहकांची मागणी आहे. चेरी, अलुबुखार, पिच ही फळे पावसाळी हंगामात बाजारात मिळतात. या फळांमध्ये भरभरून जीवनसत्त्व आणि प्रथिनांचा समावेश असतो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरतात. त्यामुळे पावसाळी फळांना भरपूर मागणी असते. पावसाला सुरुवात झाली नसली, तरी बाजारात पावसाळी फळांची आवक सुरू झाली आहे. काश्मीरहून येणारी चेरी सध्या 200 ते 300 रु. किलो या दराने उपलब्ध आहे तर, बिहारच्या लिचीचा 12 ते 15 किलोचा बॉक्स दीड हजारांच्या घरात आहे. गुजरातहून येणारे खजूर 80 ते 100 रुपये किलो दराने विकले जात आहेत. काश्मीरच्या प्लमला बाजारात 200 ते 400 रुपये किलो दर मिळत आहे.

Back to top button