‘नालेसफाईची कामे जूनअखेर पूर्ण होतील’ | पुढारी

‘नालेसफाईची कामे जूनअखेर पूर्ण होतील’

कात्रज, पुढारी वृत्तसेवा: नव्याने समाविष्ट 23 गावांतील ओढे-नालेसफाईची कामे मनपा मुख्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. ही कामे जूनअखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकार्‍यांनी सांगितले. त्यानुसार मांगडेवाडी येथे मनपा यंत्रणेच्या माध्यमातून सफाई सुरू झाल्याने नव्याने समाविष्ट गावांतील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पुणे महानगरपालिकेचा विस्तार करीत 23 गावे समाविष्ट केली. त्यानुसार ग्रामपंचायत दफ्तरही ताब्यात घेतले. मात्र, मनपा प्रशासनाकडून मूलभूत सोयी-सुविधा व कामे होत नाहीत, अशा वारंवार तक्रारी होत होत्या. मनपा हद्दीतील पावसाळीपूर्व ओढे-नालेसफाईची कामे मेअखेर उरकण्यात आली. त्यामुळे नव्याने समाविष्ट गावांतील ओढे-नालेसफाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता.

हडपसर उड्डाणपुलाखालील दुभाजक धोकादायक

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने मनपा प्रशासनाला वेळ मिळाला आणि नव्याने समाविष्ट गावांतील पावसाळीपूर्व कामे हाती घेतली आहेत. नव्याने समाविष्ट गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी भागात कात्रज डोंगररांगा, घाट परिसरात पडणारे पावसाचे पाणी वाहून आणणारे ओढे आहेत. मर्यादित उत्पन्नामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला ओढे नालेसफाई कामाला मर्यादा येत होत्या.

तसेच पात्र अरुंद व गाळ साठल्याने 2019 व ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने या ओढ्यांना महापूर येऊन आपत्तीचा सामना नागरिकांना करावा लागला होता. मनपा प्रशासनाने उशिरा का होईना; पण नव्याने समाविष्ट गावांचा विचार करून पावसाळीपूर्व ओढे-नाले सफाई कामे हाती घेतली, त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

मनपा आयुक्त यांच्या आदेशाने कात्रजलगतच्या मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी व जांभूळवाडी-कोळेवाडी या गावांतील ओढे-नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. जूनअखेर ही कामे पूर्ण केली जातील.

                    – राजेश धुमाळ, कनिष्ठ अभियंता, मुख्य विभाग

हेही वाचा

अहमदनगर : नगरपरिषद प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम

मोकळ्या जागा बनतात रात्रीच्या वेळी ‘ओपन बार’; व्हाइट कॉलर गुंडांचा धुमाकूळ

वारकर्‍यांसाठी मोबाईल शौचालय उभारणार; पालख्यांच्या तयारीसाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात बैठक

Back to top button