पुणे: अध्यक्षांसह खेडच्या जि. प. सदस्यांच्या इच्छांना सुरुंग | पुढारी

पुणे: अध्यक्षांसह खेडच्या जि. प. सदस्यांच्या इच्छांना सुरुंग

कोंडीभाऊ पाचारणे

राजगुरुनगर : जिल्हा परिषद गटरचनेत खेड तालुक्यातील अपवाद वगळता पूर्वीचे गट पूर्णपणे विस्कळीत झालेले आहेत. बदललेली गटरचना आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 2002 प्रमाणे लागू करण्यात येणारे चक्राकार आरक्षण यामुळे खेड तालुक्यातील विद्यमान सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळण्याच्या आशेवर पाणी पडल्यात जमा आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांचा यामध्ये समावेश आहे.

पाच वर्षे ज्या भागात विकासकामे केली, जनसंपर्कात सातत्य राखले अशी गावेच्या गावे दुसर्‍या गटात विलीन झाल्याने विद्यमान सदस्यांच्या पुन्हा निवडून येण्याच्या इच्छेला सुरुंग लागल्याची तालुक्यातील अवस्था आहे. याशिवाय नव्याने अस्तित्वात येत असलेल्या गटात नव्या इच्छुकांनी कार्यक्रम, बैलगाडा शर्यतीचे आयोजन, जनसंपर्क दौरे सुरू केल्याने बहुतांश विद्यमान सदस्यांची पुन्हा जिल्हा परिषदेत जाण्याची दारे बंद झाली आहेत. एवढे असताना जे सदस्य विधानसभेला इच्छुक आहेत त्यांना आताच्या निवडणुकीत पुन्हा निवडून जाणे गरजेचे आहे. रचना बदलली तरी आणि प्रसंगी गट बदलून हे इच्छुक लढणार आहेत. त्यामुळे येणारी जिल्हा परिषद निवडणूक ही पुढच्या विधानसभेची रंगीत तालीम असणार आहे. तालुक्यातील मतदार म्हणूनच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या राजकीय घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

सध्याची राजकीय स्थिती पाहता तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या बाजूला मतदारांचा कल राहण्याची शक्यता आहे. तर सेनेकडे तालुक्याची धुरा सांभाळणारे नेतृत्व नाही. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडणुकीला सामोरे जातील. भाजपाचे अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील काय व्यूहरचना करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहील.
खेड तालुक्यात पूर्वी 7 गट होते. त्यात लोकसंख्येनुसार बदल होऊन नव्याने 9 गट अस्तित्वात आले आहेत. 7 पैकी 3 सदस्य शिवसेनेकडे, 2 सदस्य राष्ट्रवादी, 2 भाजपाकडे आहेत. येणार्‍या निवडणुकीत जागा वाढल्याने चुरस असणार आहे. मात्र महाविकास आघाडीचा निर्णय आणि आदेशावर पक्षीय उमेदवारीचे गणित अवलंबून असेल.

राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांचा पिंपळगाव-रेटवडी हा तालुक्याच्या पूर्व भागात उत्तर दक्षिण असा असलेला सध्याचा गट बदलून पूर्व पश्चिम गावे असलेला पिंपळगाव-काळूस झाला आहे. नायफड-वाशेरे हा भाजपाचे अतुल देशमुख यांचा गट बहुतांश जागेवरच आहे. शिवसेनेच्या तनुजा घनवट यांनी वाडा-कडूस गटाचे प्रतिनिधित्व केले. तर लगत असलेल्या सांडभोरवाडी-काळूस गटाचे नेतृत्व सेनेच्याच बाबाजी काळे यांनी केले. या दोन्ही गटांचा अर्धाअधिक भाग एकत्र होऊन आता वाडा-सातकरस्थळ गट अस्तित्वात आला आहे. आरक्षणानंतर येथील उमेदवारीवर निर्णय घेणे पक्षश्रेष्ठींना कठीण होणार आहे. वाकी पाईट गटातून शरद बुट्टे पाटील यांनी पूर्वी राष्ट्रवादीतून आणि सध्या भाजपातून असे सलग चार वेळा वर्चस्व राखले. रचनेतील बदलाने यावेळी ते काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहील.

सांगवीतील पिकांना कालव्याच्या पाण्याचा आधार; पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

कुरुळी-मरकळ गटातून राष्ट्रवादीच्या दीपाली काळे व नाणेकरवाडी-म्हाळुंगे गटातून सेनेच्या रूपाली कड यांनी प्रतिनिधित्व केले. कुरुळी-मरकळ गट आहे तसाच आहे. तर नाणेकरवाडी-मेदनकरवाडी हा गट नव्याने अस्तित्वात आला आहे. गटरचना निश्चित झाली असली तरी आरक्षणाला अद्याप अवकाश आहे. ओबीसी आरक्षणावर काही निर्णय झाल्यास आणखी बदल होतील.

Back to top button