कुरुळी येथील मोठा डोंगर भुईसपाट; प्रशासनाचे कायम दुर्लक्ष कारणीभूत | पुढारी

कुरुळी येथील मोठा डोंगर भुईसपाट; प्रशासनाचे कायम दुर्लक्ष कारणीभूत

हनुमंत देवकर

महाळुंगे इंगळे : कुरुळी येथे चक्क पुणे-नाशिक महामार्गालगत पेट्रोल पंपाजवळ मोठा डोंगर भुईसपाट होत होता. यावेळी प्रशासनाचे लोक या महामार्गावरून प्रवास करताना याकडे कसा काणाडोळा करतात, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. याच डोंगराच्या पायथ्याला अनेकांनी हायवेलगत डोंगर पोखरून बांधकामे केली आहेत.वाघजाईनगर येथील डोंगर मधोमध फोडून त्यावर बांधकाम केले आहे.

या डोंगरावर दत्ताचे मंदिर असल्याने दोन्ही बाजूंनी डोंगर पोखरून मध्यभागी चिंचोळ्या भिंतीवर मंदिर उभे आहे. खराबवाडीच्या डोंगरावर महादेवाचे मंदिर, निघोजे येथील डोंगरावर पार्वती मंदिर असल्याने हे डोंगर अर्धे शिल्लक आहेत. अन्यथा हे डोंगरही संपूर्ण भुईसपाट झाले असते. निघोजे गावच्या हद्दीत एका बहुराष्ट्रीय कंपनीने पार्वतीचा डोंगर फोडून त्यात पाण्याची टाकी बांधली आहे. पार्वतीच्या डोंगराचे अजूनही उत्खनन चालू आहे.

सांगली : हळदीच्या बाजारपेठेला चालना मिळणार

भांबोली, खालुंब्रे, सावरदरी, वराळे, महाळुंगे व वाघजाईनगर येथे उद्योजकांनी डोंगर पोखरून त्यात कारखाने उभे केले आहेत. महाळुंगे व खराबवाडी हद्दीवरील महादेवाच्या डोंगरावरून अतिउच्च दाबाची वीज वाहिनी गेली असून तिचा विजेचा टॉवर डोंगरावर टाकला आहे व पायथ्याला एका उद्योजकाने केकसारखा डोंगर पोखरून जागा भुईसपाट करून त्यात कारखाना उभारला आहे. वाघजाईनगर येथेही उद्योजकांनी टेकडी फोडून त्यातील गौण खनिज काढून कपारीमध्ये कारखाना बांधला आहे.

डोंगर कपारीत बांधलेल्या अशा बांधकामांना केव्हाही नैसर्गिक आपत्तीचा धोका होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीलगत खराबवाडी गावच्या हद्दीतील गायरानातील शासकीय मालकीचा डोंगर डबर मालकांनी गेल्या 30 ते 35 वर्षांपासून 150 ते 200 फूट खोल खोदून डबराची अवैध विक्री करून डोंगर गिळंकृत केला आहे.

माझी वसुंधरा स्पर्धेत कराड पालिका राज्यात प्रथम

त्यात परिसरातील गावांनी कचरा टाकून मोठा कचरा डेपो बनविला आहे. त्यामुळे दगड खाणीतील पाणी दूषित होऊन ते पाणी लगतच्या विहिरींना व बोअरवेलला झिरपून जात आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर कचरा जाळून वायू प्रदूषण केले जात आहे. या कचर्‍यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भामचंद्र डोंगरदेखील असुरक्षित

ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी अध्यात्माचे धडे गिरवून तपसाधना केली, त्या आध्यात्मिक भूमीत भामचंद्र डोंगरही सुरक्षित राहिलेला नाही. डोंगराच्या पायथ्याला खासगी जागा मालकांकडून डोंगर पोखरला आहे.

 

Back to top button