पालघर : माहीम केळवे धरणाला गळती, गावकर्‍यांना सुरक्षितस्थळी हलवण्याची सूचना (video) | पुढारी

पालघर : माहीम केळवे धरणाला गळती, गावकर्‍यांना सुरक्षितस्थळी हलवण्याची सूचना (video)

पालघर : मंगेश तावडे

मनोर येथील पालघर पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या माहीम केळवे लघु पाटबंधारे योजनेवरील धरणाला मोठ्या गळती लागली आहे. यामुळे सिंचन क्षेत्राखालील गावकर्‍यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक धरण सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता मुरकुटे यांनी योजनेच्या क्षेत्रीय पाहणी दरम्यान अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मात्र, धरणाला गळती लागल्याने आतील पाणी वाया जाणार असून भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.

केळवे माहीम गावात या धरणाचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. झांजरोळी गावाच्या वरील बाजूस धरण असल्याने धरणाच्या खालील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या बाहेरील बाजूस धरणाच्या मुख्य विमोचकाच्या भिंतीच्या शीर्ष बाजूस गळती लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी करण्यात यावा, धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या भागाचे चित्रीकरण करण्यात येवून जेणेकरून गळती होत असलेल्या भागाचा अंदाज येणार आहे.

धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या नळाच्या मुखाजवळ पाणबुड्यांच्या साह्याने ताडपत्री लावून पाणी बंद करावे तसेच ताडपत्री सुटू नये याकरिता वाळूच्या पिशव्या ठेवण्यात याव्यात. धरणाच्या मुख्य विमोचकाच्या उजव्या बाजूस होत असलेल्या गळतीचा विसर्ग नियमित नोंदविण्यात यावा, धरणाच्या दोन्ही बाजूस विमोचकाच्या वर असलेले गवत व झाडेझुडपे काढण्यात यावे आदी सूचनांचा समावेश आहे.

माहीम केळवे धरणाची गळती गंभीर आहे. सदर आपत्कालीन परिस्थितीत धरणाच्या सुरक्षितेसंदर्भात, चोवीस तास निगराणी ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना व काळजी क्षेत्रीय कार्यालयामार्फत घेण्यात यावी.
– कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग, मनोर

हे ही वाचा :

Back to top button