धोक्याची घंटा: कोकणात एक लाख हेक्टरने भातशेती क्षेत्र घटले | पुढारी

धोक्याची घंटा: कोकणात एक लाख हेक्टरने भातशेती क्षेत्र घटले

पालघर : मंगेश तावडे ;  कोकणात एक लाख हेक्टरने भातशेती क्षेत्र घटले आहे. मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि औद्योगिकीकरणामुळे भातशेतीमध्ये घट आली आहे. एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख असलेले कोकण हा विभाग आता भाताच्या मुख्य पिकापासून दुरावला जात असून जवळपास 90 हजार हेक्टर क्षेत्र कोकणच्या पाच जिल्ह्यांमधून कमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

कोकणातील चढउताराच्या जमिनीवर पारंपरिक भात शेती हे मुख्य पीक होते. दहा वर्षांपूर्वी जवळपास साडेचार लाख ते पाच लाख हेक्टरवर भात लागवड होत असे आणि बाकी भातशेतीचे उत्पादन 20 हजार मेट्रिक टनापर्यंत येत होते. मात्र, आता ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी मुंबई, पुणे या महानगरांकडे येत असल्याने रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 टक्के भातशेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रपेक्षा अधिक क्षेत्रावर भातशेती होती. यात घट होऊन आता 3, 700 हेक्टर वर भात लागवड करण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये जवळपास 70 टक्के गावांमध्ये वयोवृद्ध लोकच राहत असल्याचे चित्र आहे.

या दोन्ही जिल्ह्यातील मिळून पाच लाखांपेक्षा जास्त तरुण नोकरीसाठी स्थलांतरित आहेत. याचा परिणाम भात पिकावर झाल्याचे सांगण्यात येते. तर रायगड आणि ठाणे या दोन जिल्ह्यांमध्ये वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे भात शेतीचे क्षेत्र घटले आहे. रायगड जिल्ह्यात 1 लाख हेक्टरवर भातशेती सद्यस्थितीत आहे. पूर्वी हा आकडा दीड लाख हेक्टरपर्यंत होता. पालघर जिल्ह्यात सध्या 76 हजार हेक्टरवर भातशेती असून पूर्वी तेच क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत होते. ठाणे जिल्ह्यात 54 हजार हेक्टर वर भातशेती आहे. पूर्वी एक लाख हेक्टरपर्यंत होती. कोकणात सुमारे साडेचार लाख हेक्टरवर भातशेती होती,

प्रमुख कारणे : शेतकर्‍याची उदासीनता, मनुष्यबळाचा अभाव, घरापासून दूरवर असलेली शेती, रानटी प्राण्यांचा उपद्रव, आधुनिक तंत्रज्ञानांपासून अनभिज्ञ

अल्प क्षेत्रावरच लागवड

कोकणची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. मग ती भातशेती असो व अन्य. भातपिकाच्या पडीक क्षेत्रात पुन्हा एकदा घट निर्माण झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात भातशेती योग्य क्षेत्रापैकी आता अल्प क्षेत्रावरच लागवड होताना दिसत आहे. त्यामुळे या शेतीप्रधान जिल्ह्यांसाठी ही चिंताजनक बाब असून कृषी अर्थव्यवस्थेसमोर धोक्याचीच घंटा आहे.

खरीप हंगामातील लागवड         

जिल्हा क्षेत्र             उत्पादकता                  किलो/हेक्टर                      मेट्रिक टन
ठाणे                       54923                    2117 किलो/हेक्टर              1162.71
पालघर                    76644                    2232 किलो/हेक्टर              1710.69
रायगड                  101012                    2328किलो/हेक्टर               2352.55
रत्नागिरी                   68105                    2969 किलो/हेक्टर              2022.03
सिंधुदुग                   62416                     2831किलो/हेक्टर               1766.99

Back to top button