पालघर जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी ! | पुढारी

पालघर जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी !

पालघर : पुढारी वृत्तसेवा :  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

4 ते 8 जुलै 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या 3-3 रांगा करू नये, प्रवासात आवश्यक खबरदारी घ्यावी, वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, अतिवृष्टीमध्ये रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी, आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी भरणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे,

या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये, घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक क साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे, घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तु विजेचे खांब किंवा तारा, झाडे यांपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button