वाहन चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश | पुढारी

वाहन चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश

ठाणे : संतोष बिचकुले :  मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणार्‍या वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबईतील शिवाजी नगर पोलिसांनी केली. या कारवाईत पोलिसांनी 4 सराईत आरोपींसह चोरीची रिक्षा घेणार्‍याला अटक केली केली आहे. कारवाईदरम्यान या आरोपींकडून 9 लाख 90 हजार रुपयांच्या 6 मोटासायकल व 5 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. हे आरोपी हाती लागल्याने 14 गुन्ह्यांची उकल झाली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी दै. पुढारीला सांगितले.

मुंबईतल्या चेंबूर परिसरातील शिवाजीनगर येथे वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. याचा वाहन चालकांनी धसका घेतला. सदर बाब लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्‍लेषण केले असता आरोपींची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि नवनाथ काळे, हवालदार सावंत, अंमलदार मेटकरी, बैलकर, मयूर चव्हाण, थोरात यांनी शिवाजी नगर परिसरात सापळा लावून आरोपी अब्दुल मलिक अब्दुल वाहिद शेख (वय 23), सददाम अली हसन शेख (वय 23), मोहम्मद अफझल रईस अहमद अन्सारी (वय 22) यांच्या मुसक्या आवळल्या.

या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत चोरलेल्या वाहनांची माहिती दिली. तसेच या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका साथीदाराचे व चोरीची रिक्षा विकत घेणार्‍यांची माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नालासोपारा परिसरातून मोहम्मद शेहजाद अब्दल कादर शेख (वय 22) व कल्याणमधून महादेव भामरे याला अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

14 गुन्ह्यांची उकल

वायरिंगमध्ये छेडछाड करून मोटारसायकल, रिक्षा पळवल्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या आरोपींच्या अटकेमुळे शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 10 गुन्हे तर पालघरमधील नालासोपारा व तुळींज पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा, कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल असलेला व ठाणे नगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 गुन्हा अशा एकूण 14 गुन्ह्यांची उकल करण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे.

Back to top button