धुळे : ‘मिशन संवेदना’उपक्रमांतर्गत ५ हजार ३०० लाभार्थींना लाभ | पुढारी

धुळे : ‘मिशन संवेदना’उपक्रमांतर्गत ५ हजार ३०० लाभार्थींना लाभ

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या कार्यक्रमातून पाच हजार तीनशे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमात आलेल्या हजारो दिव्यांगांनी आपली नाव नोंदणी केली असून येत्या तीन महिन्यात या सर्व दिव्यांगांना शासनाच्या 10 कलमी कार्यक्रमांनुसार मदत केली जाणार आहे. विशेषता या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत आमदार बच्चू कडू यांनी स्वतः जाऊन भेट घेतली. त्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

धुळ्यात आज झालेल्या दिव्यांग विभाग आपल्या दारी या कार्यक्रमात हजारो दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा प्रशासनाने अपेक्षित धरलेल्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त लाभार्थीनी या कार्यक्रमात हजेरी लावली. या लाभार्थींच्या नाव नोंदणीसाठी वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षांच्या समोर मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांची गर्दी झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सभागृहाच्या बाहेर खुर्च्यांची अतिरिक्त व्यवस्था करावी लागली. कार्यक्रमात दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी हजेरी लावली. एरवी शासकीय कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. पण धुळ्यात झालेला हा कार्यक्रम त्याला अपवाद ठरला. आमदार कडू यांनी अंधशाळेतील विद्यार्थिनीला सोबत घेऊन तिच्या हस्ते सुरुवातीला दीप प्रजनन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.तसेच नेहमीच्या कार्यक्रमांमध्ये लाभार्थ्यांना मंचावरून मार्गदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता केल्याचे चित्र नेहमी दिसते. मात्र दिव्यांग बांधवांचा धुळ्यातील कार्यक्रम त्याला अपवाद ठरला. आमदार बच्चू कडू यांनी मंचाच्या खाली येऊन प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची आस्थावाईकपणे चौकशी केली. यावेळी दिव्यांग बांधवांचे समस्या असणारे निवेदन देखील त्यांनी स्वीकारले. तर मंचावरून त्यांनी एका कागदावर संबंधित लाभार्थ्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक तसेच समस्या लिहिण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने लिहिलेला कागद आमदार कडू यांनी स्वीकारला. त्यांनी प्रत्येक लाभार्थीची म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे या कार्यक्रमात समस्या घेऊन आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटल्याचे चित्र देखील दिसून आले.

या कार्यक्रमांत 5 हजार 300 लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आला. दिव्यांगांचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात आता मिशन संवेदना हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण दहा सुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यांना झाले लाभाचे वितरण

आमदार कडू तसेच मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानातंर्गत गोविंदा माधवराव पाटील यांना खेळते भांडवलाचा धनादेश वितरण, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत योगेश पाटील यांना घरकुलाच्या दुसऱ्या हप्ताचे वितरण, रत्नाबाई भासले, दशरथ राठोड यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रमाणपत्र, प्रमोद महाले, मंदाकिनी गायकवाड यांना ई -शिधापत्रिका, श्रीमती गंगुबाई गिरासे यांना प्राधान्य कुटूंब योजनेतंर्गत धान्य वाटप, गणेश बडगुजर, संतोष मोरे यांना स्वंयरोजगारासाठी बीज भांडवलाचा धनादेश वाटप, दिव्यांग प्रोत्साहन योजनेतंर्गत विजय बागुल यांना संसारोपयोगी साहित्य वाटप, पंढरीनाथ सोनवणे यांना वृद्ध कलावंत मानधन योजनेचे प्रमाणपत्र वाटप, रायफल शुटींग मध्ये राष्ट्रीय खेळाडू दर्शना गवते, राहुल बैसाणे यांना स्मृतीचिन्ह वाटप, साई गिरवरलकर, हर्ष जाधव यांना शालांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेंतर्गत धनादेश वाटप, सुरेश अमृतकर, प्रतिभा पाठक, मंगलसिंग पवार, दिपक पहाडे, सिमरण शेख यांना युडीआयडी प्रमाणपत्र वाटप,रतिलाल चौरे यांना शबरी विकास योजनेतंर्गत घरकुल वाटप, संजय पाटील यांना गुराचा गोठा वितरण आदेश, रोजश नेरकर यांना कल्याणकारी योजना धनादेश वाटप, निल पाटील यांना एमआयसी थेरपी साहित्य वाटप, सुरेखा चौधरी, कैलास पाटील, शामली रोकडे यांना दिव्यांग सहायक योजनेतून वैयक्तिक लाभाचे वितरण, धुळे महापालिकेतील नितीन पाटील, सचिन चौधरी यांना दुचाकीचे वाटप, हिलाल माळी यांना दिव्यांग 5 टक्के लाभ, चंद्रमुनी शिंदे, सिध्दार्थ शिंदे यांना दुधाळ गायी म्हशीचे आदेश वाटप, हर्षाली महाले, शामली रोकडे यांना मतदान ओळखपत्र वाटप, हिरामण थोरात, बबलु ढोमले यांना नियुक्ती पत्र वाटप, तसेच झिपा केंदार यांना डॉ. बाबासाहेब कृषि स्वालंबन योजनेतंर्गत नवीन विहीर खोदकाम लाभाचा धनादेश प्रातिनिधीक स्वरुपात देण्यात आला.

अँटी करप्शन विभागाची जनजागृती

धुळे शहरात झालेल्या या कार्यक्रमात धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात आली. उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागातील कर्मचाऱ्यांनी दिव्यांग बांधवांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामाची माहिती दिली. शासकीय कामासाठी कोणत्याही व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास या विभागास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संबंधित दिव्यांग व्यक्तीला एक व्हिजिटिंग कार्ड देखील देण्यात आले .या कार्डमधील ई-मेल किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केल्यास लाचखोर व्यक्तीवर निश्चित कारवाई केली जाईल. तसेच तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button