Nashik Aapala Dawakhana | मनपाचा ‘आपला दवाखाना’ आठवडाभरात सुरु होणार | पुढारी

Nashik Aapala Dawakhana | मनपाचा 'आपला दवाखाना' आठवडाभरात सुरु होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्य शासनाच्या हिंदुहद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून २५ आपला दवाखाने सुरू करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १४ दवाखाने येत्या आठवडाभरात सुरू करण्याचे नियोजन आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत केले जात आहे. यासाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध झाली असून, साहित्यदेखील प्राप्त झाले आहे. मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा निर्णय आचारसंहितेनंतर घेतला जाणार आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून शहरात ४६ आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आता राज्य शासनाच्या माध्यमातूनही हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना अंमलात आणली जात आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा कायम आहे. या केंद्रांसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती मानधनावर करण्यात आली. मात्र, नियुक्ती आदेश देऊनही अनेक जण कामाच्या ठिकाणी हजरच झाले नाही. त्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्रतीक्षा यादीतील डॉक्टर्स तसेच स्टाफ नर्स, आरोग्यसेवक व सेविकांना नियुक्ती  पत्र देता आले नाही. आता लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात नाही येत तोच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या मनुष्यबळाचा प्रश्न कायम आहे. त्यातच आता आपला दवाखाना सुरू करण्याचे नियोजन वैद्यकीय विभागाने केले आहे. येत्या आठ दिवसांत हे दवाखाने सुरू होणार आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी या दवाखान्यांचे काम सुरू होणार नाही. यामुळे आचारसंहिता संपुष्टात येण्याची प्रतीक्षा या दवाखान्यांनादेखील करावी लागणार आहे.

१४ आपला दवाखान्यांसाठी जागा मिळाल्या आहेत. संबंधित ठिकाणचे फर्निचर व इतर कामे झाली असून, येत्या आठ दिवसांत ते सुरू होतील. त्यासाठीचे साहित्यदेखील आपल्या तपोवनातील आरोग्य केंद्राच्या ठिकाणी असलेल्या गोडावूनमध्ये आले आहे.

– डॉ. तानाजी चव्हाण, प्रमुख आरोग्य अधिकारी, मनपा

हेही वाचा –

Back to top button