ICC Men’s T20 World Cup : नेपाळ झुंझले, क्रिकेट जिंकले..! थरारक सामन्‍यात द. आफ्रिकेचा एका धावेने विजय | पुढारी

ICC Men's T20 World Cup : नेपाळ झुंझले, क्रिकेट जिंकले..! थरारक सामन्‍यात द. आफ्रिकेचा एका धावेने विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघासमोर नवोदित नेपाळ काय टिकणार? असाच काहीसा सूर आज (दि. १५) क्रिकेटप्रेमींचा होता. दक्षिण आफ्रिका एकतर्फी सामना जिंकले, त्‍यांच्‍यासाठी तर हा सराव सामना आहे, असा अंदाजही व्‍यक्‍त होत होता. मात्र आम्‍ही आमच्‍या खेळाने क्रिकेटविश्‍वाला दखल घेण्‍यास भाग पाडू, अशा वृत्तीने नेपाळचे खेळाडू मैदानावर उतरले. त्‍यांनी सर्वस्‍व पणाला लावले. त्‍यांच्‍या खेळीनंच टी-20 क्रिकेटचा थरार आज (दि.१५) पुन्‍हा एकदा क्रिकेटप्रेमींना अनुभवता आला. रोमहर्षक सामन्‍यात ऐतिहासिक कामगिरीपासून नेपाळचा संघ केवळ एक धाव दूर राहिला. अखेर हा सामना दक्षिण आफ्रिकेने १ धावेने जिंकला खरा;पण अवघ्‍या क्रिकेट विश्‍वाचे मन नेपाळ संघाने जिंकले. यापुढे आम्‍हाला गांभीर्याने घ्‍या, असा संदेशही त्‍यांनी सर्वच संघाना दिला आहे. जाणून घेवूया आजच्‍या सामन्‍या नेमकं काय घडलं याविषयी…

नेपाळने केले उत्‍कृष्‍ट गोलंदाजीचे प्रदर्शन, द. आफ्रिकेला ११५ धावांवर रोखले

नेपाळचा कर्णधार रोहित पौडले याने टॉस जिंकला. त्‍याने दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्‍याचे निमंत्रण दिले. अपेक्षेप्रमाणे द. आफ्रिका संघाचे सलामीवीर रीझा हेंड्रिक्स आणि क्विंटन डी कॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, मात्र चौथ्या षटकात संघाला पहिला धक्‍का बसला. १० धावांवर खेळारा डी कॉक तंबूत परतला. पॉवरप्लेमध्ये ( पहिल्‍या सहा षटकांमध्‍ये) दक्षिण आफ्रिकेने एक विकेट गमावत ३८ धावा केल्‍या होत्‍या. नेपाळच्‍या गोलंदाजींनी उत्‍कृष्‍ट प्रदर्शन करत १५ धावांवर खेळणार्‍या कर्णधार एडन मार्करामला बाद केले. ४२ धावांवर द. आफ्रिकेला दुसरा धक्‍का बसला. यानंतर हेन्रिक क्लासेन केवळ 3 धावा करून बाद झाला. रीझा हेंड्रिक्सने डावाला आकारला दिा. डेथ ओव्हर्समध्ये त्याला ट्रिस्टन स्टब्सची साथ मिळाली. मात्र, नेपाळ संघाची कामगिरी वरचढ ठरली. नेपाळकडून कुशल भुर्तेलने चार षटकांत फक्त 19 धावा देत 4 बळी घेतले. तर दीपेंद्र सिंग ऐरीने चार षटकांत २१ धावा देत तीन बळी घेतले. नेपाळच्या भक्कम गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका संघ २० षटकांमध्‍ये ७ गमावत केवळ ११५ धावांपर्यंत मजल मारु शकला.

फलंदाजीत नेपाळची आश्‍वासक सुरुवात पण…

नेपाळ समोर विजयासाठी ११६ धावांचे आव्‍हान होते. संघाने संथ पण आश्‍वासक सुरुवात केली. पॉवरफ्‍लेमध्‍ये एकही विकेट न गमावता ३२ धावा केल्‍या. सलामीवीर आसिफ शेख आणि कुशल भुरटेल यांच्यात पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी झाली. मात्र १३ धावांवर खेळार्‍या कुशल भुर्तेल याला तबरेज शम्सीने तंबूत धाडले. कर्णधार रोहित पौडेल याने निराशा केली. त्‍याला खाते उघडता आले नाही. नेपाळने ३ गडी गमावत ५९ धावांपर्यंत मजल मारली तेव्‍हा सामना नेपाळ जिंकले, असे चित्र होते. मात्र तबरेझ शम्सीने एकाच षटकात दोन बळी घेतले आणि नेपाळ बॅकफूटवर गेला. दक्षिण आफ्रिकेने सामन्‍यात कमबॅक केले. शम्सीने प्रथम सेट बॅट्समन असिफ शेखला 42 च्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केले आणि नंतर दीपेंद्र सिंग ऐरीची विकेट घेतली.

क्रिकेटप्रेमींनी अनुभवला थरार, दक्षिण आफ्रिकेचा अवघ्‍या १ धावेने विजय

नेपाळला शेवटच्‍या दोन षटकांमध्‍ये १६ धावांची गरज होती. १९ षटकात नेपाळने ८ धावा केल्‍या. मात्र शेवटच्‍या षटकात गुलशन झा याने सहा धावा केल्‍या. मात्र शेवटच्‍या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज असताना तो बाद झाला. नेपाळला २० षटकांमध्‍ये ७ गडी गमावत केवळ ११४ धावा करता आला आणि एका ऐतिहासिक विजय मुकला. दक्षिण अफ्रिकेसाठी शम्सीने चार बळी घेतले. तो सामनावीर ठरला. मात्र दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला असला तरी नेपाळने आपल्या कामगिरीने मन जिंकले.

हेही वाचा : 

 

Back to top button