रक्षा खडसे म्हणतात अजूनही विश्वास बसेना, मी मंत्री झाले… | पुढारी

रक्षा खडसे म्हणतात अजूनही विश्वास बसेना, मी मंत्री झाले...

जळगाव पुढारी वृत्तसेवा- मला अजूनही विश्वास बसत नाही की मी मंत्री झाले आहे. कारण गेल्या दहा वर्ष काम आणि खासदार पद एवढेच माहीत होते. मंत्री पदाचा कधीच विचार केला नव्हता. यावर्षीही केला नव्हता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी दिली. माझ्या माध्यमातून रावेर लोकसभा मतदारसंघातील जनताच मंत्री झालेली आहे !” अशा शब्दात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.

रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी दणदणीत मताधिक्याने विजय मिळवला. यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच विस्तारात त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी देखील मिळाली. यात त्यांना केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार देखील स्वीकारला आहे.

त्यानंतर मतदारसंघात पोहच्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  आता आपल्या देशातील युवकांसाठी चांगल काम करता येईल. युवकांची ताकद आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कशी वापरता येईल या दृष्टीने काम करता येईल. खेळामध्ये भारत देश आता अनेक विक्रम करीत आहे. ऑलम्पिक मध्येही आपले खेळाडू चमकू लागलेले आहेत. पुढील महिन्यात स्पर्धा होणार आहे, त्यासाठी आपला भारतीय संघ ही जात आहे. ते ग्रामीण भागापर्यंत कसे आणता येईल व यातून चांगले कसे निर्माण करता येईल हे आव्हान आहे मात्र दिलेली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. मनापासून सर्वांचे आभार मानते अशी प्रतिक्रिया ना. रक्षा खडसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर पहिल्यांदाच भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यावर पत्रकारांशी बोलताना दिली.

भुसावळात जंगी स्वागत !

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीस गेलेल्या रक्षा खडसे या आज पहाटे मुंबई येथून भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्या असता त्यांचे अगदी जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांची रेल्वे गाडी फलाटावर थांबताच जोरदार जयघोष करत त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, ज्येष्ठ पदाधिकारी परिक्षीत बर्‍हाटे, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, पिंटू कोठारी, नितीन धांडे, यावल येथील डॉ. कुंदन फेगडे आदींसह भुसावळ शहर व तालुका तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थितीती होती.

हेही वाचा-

Back to top button