Dindori Lok Sabha Elections | दिंडोरीत कांदा कोणाला रडवणार? वाढीव टक्का ठरणार निर्णायक | पुढारी

Dindori Lok Sabha Elections | दिंडोरीत कांदा कोणाला रडवणार? वाढीव टक्का ठरणार निर्णायक

नाशिक : गौरव जोशी

कांदा निर्यातबंदीमुळे अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने निवडणुकीतील मतदान टक्का वाढीची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. दिंडोरीत ६६.७५ टक्के मतदान झाले असून, २०१९ च्या तुलनेत १.१० टक्के अधिकचे मतदान नोंदविले गेले. निवडणूक घोषित झाल्यापासून दिंडोरीची निवडणूक कांद्याभोवती फिरते आहे. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार भाजपाच्या तिकिटावर दुसऱ्यांदा रिंगणात उतरल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले. त्यामुळे कांद्याच्या आगारात कोण बाजी मारणार व कांदा कोणाला रडविणार हे ४ जूनला निकालानंतर स्पष्ट होईल.

नऊ तालुके व सहा विधानसभा मतदारसंघांचे कार्यक्षेत्र असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विस्तार २२५ किलोमीटर पसरलेला आहे. राखीव मतदारसंघ असलेल्या दिंडोरीमध्ये आदिवासी, मराठा, एससी-एसटी तसेच अन्य समाजाचे मतदान आहे. द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यात लासलागाव-पिंपळगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठे कांद्याचे आगार आहे. एकीकडे पेठ-सुरगाण्यातील १-दोन एकर क्षेत्र असलेला आदिवासी शेतकरी. तर दुसरीकडे द्राक्ष-कांदा उत्पादक असा दोन विभागांत हा मतदारसंघ विभागला आहे. नांदगाव, येवला, चांदवड-देवळा हे तालुके सातत्याने दुष्काळी म्हणून गणले जातात. अशा या दिंडाेरी मतदारसंघावर २००४ पासून (२००९ पूर्वीचा मालेगाव मतदारसंघ) भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे. परंतु, यंदाची निवडणूक भाजपसाठी म्हणावी तशी सोपी नव्हती.

दिंडाेरीत चार टर्ममधील मतदान

  • 2009 : 47.57
  • 2014 : 63.41
  • 2019 : 65.65
  • 2024 : 66.75

लोकसभेचा बिगुल वाजण्याच्या पहिल्या दिवसापासूनच दिंडोरीत कांद्याचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी लावलेल्या निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोलमडले. त्यामुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ ओढावल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. त्यातच मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती, कांद्याप्रमाणेच टोमॅटो व अन्य शेतीपिकांचे घरसलेले दरामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यातच रखडलेले निफाड ड्रायपोर्ट, रेल्वे कनेक्टिव्हिटी आदी प्रश्नांमुळेही जनतेत रोष आहे. या सर्व धामधुमीत सोमवारी (दि.२०) दिंडाेरीमध्ये मतदान पार पडले. पाचव्या व राज्यात अखेरच्या टप्प्यात पार पडलेल्या १३ जागांमध्ये दिंडोरीतच सर्वाधिक मतदान नोंदविले गेले. दहा उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले असले तरी खरी लढत डॉ. पवार विरुद्ध भास्कर भगरे यांच्यातच आहे.

नांदगाव मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. यंदा ५८.२४ टक्के नांदगावकरांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. २०१९ ला ५७.४१ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे तेव्हाची तुलना केल्यास ०.८३ टक्के मतदान वाढले आहे. आमदार सुहास कांदे यांनी घेतलेल्या सभा व मेळाव्यांचा फायदा डॉ. पवार यांना मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. डॉ. पवार यांचे होमटाउन असलेल्या कळवणमध्ये २०१९ च्या तुलनेत यंदा १.७३ टक्के मतदान कमी झाले. २०१९ ला ७२.६२ तर यंदा ७०.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणुकीपूर्वी पवार कुटुंबातील भावजय व दीर यांच्यात समेट झाला. त्यामुळे आ. नितीन पवार यांनी त्यांची ताकद पवारांच्या पाठीशी उभी केली. मात्र, माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी निवडणुकीतून माघार घेत महाविकास आघाडीचे भगरे यांना पाठिंबा दर्शविला. त्यामुळे गावित यांच्यापाठीमागे असलेली एकगठ्ठा मते भगरेंच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.

चांदवड-देवळ्यात डॉ. राहुल आहेर यांची ताकद असून, त्याचा फायदा भाजप पर्यायाने डॉ. पवार यांना होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. असे असले तरी माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा मतदारांवरील करिष्मा यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. मतदारसंघात ६६.६५ टक्के मतदान झाले असून, गेल्या वेळेपेक्षा १.५७ टक्का मतदान वाढले. मंत्री छगन भुजबळ यांचा येवला हा बालेकिल्ला आहे. यंदा मतदारसंघात ६५.३८ टक्के मतदान नोंदविले गेले. २०१९ च्या तुलनेत यंदा ४.२३ टक्के मतदान अधिक झाले. येवला शहरात भाजपचा मतदार पक्षाच्या पाठीशी एकनिष्ठ राहिल्याचे बोलले जात आहे. तरी ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका पवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कांद्याचे आगार व द्राक्षपंढरी असलेल्या निफाड मतदारसंघात यंदा कांद्यानेच सर्वाधिक वांदा केला आहे. निफाडमध्ये ६४.३१ टक्के मतदान झाले असून, यंदा एक टक्का मतदान अधिक झाले आहे. डॉ. पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांनी सभेच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका वठवली. पण या सभेत कांद्यावर बोला, असा सूर एका शेतकऱ्याने आळवल्याने सभेचा नूर काहीसा बदलला. त्याचा फटका पवारांना काही प्रमाणात बसू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दिंडोरीत यंदा विक्रमी मतदान

भास्कर भगरे यांचा कर्मभूमी असलेल्या दिंडोरी मतदारसंघात यंदा विक्रमी ७५.४२ टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीतील मतदानावर नजर टाकल्यास तब्बल ५.९२ टक्के मतदान वाढले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भगरेंच्या होमटाउनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम शेटे यांनी आपली ताकद भगरेंच्या पाठीशी उभी केली. तर शेटेंचेच शिष्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे डॉ. पवारांसाठी मतांचा जोगावा मागत होते. मात्र, गुरू-शिष्याच्या लढाईत गुरूची बाजूच वरचढ ठरेल, अशी आशा व्यक्त केली जातेय. अर्थात चार जूनला निकालानंतर याचा फैसला होईल.

महायुतीपुढे आव्हान

दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. त्यामध्ये कळवण, येवला, निफाड व दिंडाेरी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असून चांदवड व नांदगावमध्ये अनुक्रमे भाजप व शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. मात्र, असे असले तरी शेतकऱ्यांची नाराजी, गेल्या अडीच वर्षांत डॉ. पवार यांचे मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष तसेच रखडलेले प्रश्न अशा विविध बाबींमुळे जनतेचा रोष होता. त्यामुळे हा रोष कमी करण्याचे आव्हान महायुतीपुढे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून उभे ठाकले होते.

हेही वाचा-

Back to top button