Dhule News | 50 हजारांची लाच स्विकारतांना म्हसदीचे ग्रामसेवक धुळे एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

Dhule News | 50 हजारांची लाच स्विकारतांना म्हसदीचे ग्रामसेवक धुळे एसीबीच्या जाळ्यात

पिंपळनेर, जि.धुळे- पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील म्हसदी ग्रामपंचायत सदस्य महिलेने त्यांच्या वार्डात विकास कामांकरीता ग्रामपंचायतीत अर्ज सादर केला होता. अंदाजपत्रिकेत 12 लाख रूपयांचे काम होते. यातील 20 टक्के म्हणजे 2 लाख 40 हजार रूपये ठेकेदाराकडुन कमिशन घेवून द्यावे लागेल, अशी मागणी ग्रामसेवक मेघशाम रोहिदास बोरसे याने केली. यातील 50 हजार रूपयांची लाच स्विकारतांना धुळे एसीबीने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले.

अधिक वृत्त असे की, तक्रारदार हे मौजे म्हसदी (प्र.नेर)येथील रहिवासी असून त्यांची पत्नी म्हसदी (प्र.नेर) ग्रा.पं.सदस्य आहेत. पत्नी अशिक्षीत असल्याने त्यांच्या वार्डात विकासकामे मंजुर होण्याकरीता पत्नीच्या वतीने तक्रारदार हे सरपंच व ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांना वेळोवेळी भेटुन पाठपुरावा करीत होते. वार्डात उर्दू शाळेस संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक व शाळेच्या मुला-मुलींकरीता सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळणेकरीता अर्ज देवून त्यांना विनंती केली असता ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांनी सदर कामाच्या अंदाजपत्रिकेत 12 लाख रूपये किंमतीच्या 20 टक्के म्हणजे 2 लाख 40 हजार रूपये संबंधीत ठेकेदाराकडून आगाउ कमिशन घेवून द्यावे लागतील,अशी मागणी केली. परिणामी, तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 20 एप्रिल रोजी घडला वृत्तांत कथन केला. त्यावर धुळे एसीबीने तक्रारीची शहानिशा करून ग्रामपंचायत कार्यालयात काल सापळा रचला. दरम्यान,तडजोडीअंती 2 लाख रूपयांपैकी 50 हजार रूपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे ग्रामसेवक मेघशाम बोरसे याने मान्य केले होते. त्यानुसार 25 एप्रिल रोजी म्हसदी (प्र.नेर) ग्रामपंचायत कार्यालयात 50 हजारांची लाच स्विकारतांना मेघशाम बोरसे यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरूध्द साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील,पोनि रूपाली खांडवी, तसेच राजन कदम,मुकेश अहिरे,प्रशांत बागुल,संतोष पावरा,रामदास बारेला,प्रविण मोरे,प्रविण पाटील,मकरंद पाटील,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर या पथकाने केली.

हेही वाचा –

Back to top button