नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून ‘डॅमेज कंट्रोल’ ; नाराजीनाट्यानंतर दगाफटका टाळण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या | पुढारी

नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून 'डॅमेज कंट्रोल' ; नाराजीनाट्यानंतर दगाफटका टाळण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या नाराजीनाट्यात पक्षाला दगाफटका होऊ नये, यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवळाली, नाशिक रोड, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. माजी नगरसेवक केशव पोरजे आणि निवृत्ती लांबे यांच्याकडे उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांसाठीदेखील तालुकाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय करंजकर यांची उमेदवारी कापत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने करंजकर नाराज आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून करंजकर तसेच माजी आमदार योगेश घोलप ठाकरे गटाच्या कुठल्याही बैठकांना उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. करंजकर यांची नाराजी दूर केली जाईल, असे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात त्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच करंजकर यांची नाराजी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातून पक्षाला आणखी दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेत ठाकरे गटाने आता करंजकर यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या देवळाली, नाशिकरोड, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या झाल्याने नवीन पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून, ते आपल्या पदाला पुरेपूर न्याय देतील, असा विश्वास सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला आहे. या नवीन नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे.

असे आहेत नवनियुक्त पदाधिकारी

नव्याने नियुक्त झालेल्या उपजिल्हाप्रमुख निवृत्ती लांबे यांच्याकडे त्र्यंबकेश्वर, हरसूल, ठाणापाडा तर केशव पोरजे यांच्याकडे गोवर्धन, गिरणारे गट, देवळाली, भगूर, नाशिक रोड, जेल रोडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच तालुकाप्रमुख म्हणून समाधान बोडके (त्र्यंबकेश्वर पूर्व), नितीन लाखन (त्र्यंबकेश्वर पश्चिम), राजाभाऊ नाठे (इगतपुरी) यांची नियुक्ती झाली आहे. विधानसभा प्रमुख म्हणून कचरू पाटील-डुकरे (इगतपुरी), संपत चव्हाण (त्र्यंबकेश्वर), तर विधानसभा समन्वयक म्हणून भगवान आडोळे (इगतपुरी) व देवीदास जाधव (त्र्यंबकेश्वर) यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधानसभा उपप्रमुख म्हणून सोमनाथ जोशी यांची नियुक्ती झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button