AI in Stock Market | शेअर बाजारात आता कृत्रिम बुद्धिमत्ता, फायदे काय? | पुढारी

AI in Stock Market | शेअर बाजारात आता कृत्रिम बुद्धिमत्ता, फायदे काय?

अर्थज्ञान : प्रा. विजय ककडे

शेअर बाजार हा गतिमान व अचूक निर्णय क्षमतेचा खेळ असून, त्यामध्ये मानवी निर्णयप्रक्रिया संगणक प्रणालीसोबत अंतिम यश किंवा फायदा अथवा नुकसान ठरवते. मर्यादित लोकांचा एका विशिष्ट वर्तुळात (व्यापार वर्तुळ) चालणारा हा व्यवहार अल्पावधीत इंटरनेटच्या माध्यमातून व स्मार्ट फोनच्या वापराने विस्तारला. यामध्ये स्मार्ट गुंतवणूकदार व स्मार्ट व्यवहार करणारे यांच्यापेक्षा स्मार्ट सल्ला देणारे अधिक उत्पन घेणारे ठरले. प्रवेशावर बंधने नाहीत व बाजारातून कधीही बाहेर पडणे शक्य असल्याने, गुंतवणूकदारांच्या संस्थेबरोबर बाजाराची व्याप्ती व खोली वाढली. स्थानिक गुंतवणूकदारांचा म्युच्युल फंडातून मिळालेला सहभाग व पाठिंबा यातून केवळ एका वर्षात 14 हजार कोटी गुंतवणूक दरमहा होत होती, ती 20 हजार कोटींचा टप्पा (2023-24) गाठू शकली. यातून सेन्सेक्स 75 हजार पार झालाच; पण त्यासोबत परकीय गुंतवणूकदारांवरील अवलंबित्व कमी होऊन बाजारात स्थैर्य प्राप्त झाले. 2047 म्हणजे भारताच्या स्वतंत्रता शतकपूर्तीवेळी सेन्सेक्स 10 लाख होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. निफ्टी 3 लाख पार होईल व भारतीय भांडवलबाजार जागतिक वित्त बाजारात महासत्ता असू शकतो. या गुणात्मक व संख्यात्मक विस्तारात आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI- Artifical Intellgence) महत्त्वाची भूमिका पार पाडणार असून, त्याची भूमिका समजावून घेणे महत्त्वाचे ठरते.

कृत्रिम बुद्धिमत्ता ः नवे क्षितिज

केवळ मानवी प्रेरणा आणि गुंतागुंतीचे अल्गोरिदम यातून पुढे नेण्यास कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ शेअर्सचे विश्लेषणच नव्हे, तर संपूर्ण वित्तबाजार बदलून जाणार असून, त्याचे महत्त्व तसेच फायदे व मर्यादा महत्त्वाच्या ठरतात. आतापर्यंत पूर्वीची आकडेवारी, तांत्रिक विश्लेषण व गुणोत्तरे आणि व्यक्तिगत अंदाज यातून खरेदी-विक्री निर्णय प्रक्रिया गतिमान असे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने प्रचंड मोठी आकडेवारी, वित्तीय क्षेत्रातील बातम्या, समाज माध्यमातून व्यक्त होणारे भावनिक प्रवाह आणि जागतिक प्रवाह यांचा वापर करून निर्णय घेतले जाणार आहेत. माहिती गोदामांचा प्रभावी वापर कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते. दुसरे म्हणजे याच्या मदतीने यापूर्वी ज्ञात नसलेल्या चलांचा संबंध व भविष्यकालीन बाजारकला समजणे शक्य होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अल्गो अनेक संमिश्र व जटिल आकृबंध आता निर्णय घेण्यास आधारभूत ठरतील. शेअर्स व्यवहारात वेग व अचूकता यांचे मिश्रण जे मानवी कौशल्याच्या पलीकडे असते, असे मिली सेकंदात असणारी संधी शोधून फायदा देऊ शकते. शेअर व्यवहारात अनेकदा मानवी घटक किंवा भावनात्मक घटक चुकीचा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरते; परंतु भावनारहित, नियम आधारित व संख्यात्मक विश्लेषण आधारित निर्णय हे कृत्रिम बुद्धिमत्ता वापराने शक्य होते.

फायदे आणि मर्यादा

कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेअर व्यवहार केल्याने विविध प्रकारचे फायदे अशा लोकांना मिळू शकतात. भविष्यकालीन कल अभ्यासण्यास कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचंड मोठी आकडेवारी अचूकपणे वापरू शकते. यातून अचूकतेची शक्यता वाढते. दुसरे म्हणजे जोखीम कमी करण्यास व भविष्यकालीन संभाव्य घसरण लक्षात घेऊन, नुकसान टाळण्यास याचा वापर होतो. ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य कमी आहे व त्यातून मोठा फायदा मिळू शकतो. त्याबाबतही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र उपयुक्त ठरते. जोखीम व्यवस्थापन आणि परतावा वाढवणे, हे उद्दिष्ट साध्य करता येते. व्यवहारांची गती बुलेट ट्रेनपेक्षा वेगवान असल्याने, बाजारात रोखता वाढीस त्याची मदत होते. दिवसभराचे व्यवहार तासाभरात झाल्याने एकूण सरकारला मिळणारा कर महसूल लक्षणीय प्रमाणात वाढू शकतो. तंत्रज्ञान सुधारणा ही फक्त काही मर्यादित लोकांची मक्तेदारी न राहता, ती प्रत्येकास उपलब्ध होणार असल्याने आर्थिक लोकशाही प्रस्थापित होते. पण याचबरोबर कोणतेही तंत्र हे दुपारी शस्त्र असते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र हे संस्थात्मक माहिती वापरावर आधारित असून चुकीची, अपुरी, भ्रामक आकडेवारी गुगल अ‍ॅपप्रमाणे भलतीकडेच नेण्याचा संभाव्य धोका यामध्ये आहे. यातून तत्काळ चूक होण्याचा धोका निर्माण होतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरत असणारी प्रक्रिया गुंतागुंतीची व तर्कस्पष्टता नसणारी असते. यातून गोंधळ होण्याचा धोका निर्माण होतो. जागतिक तणाव हा महायुद्धाचा धोका व महामंदीस कारक असा निष्कर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता काढू शकेल व त्यातून प्रचंड चढउतार बाजारात येऊ शकतात. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता न वापरणारेदेखील मोठे नुकसान देऊ शकतात. याचा वाढता वापर हा तज्ज्ञ सल्लागारांचे, विदा विश्लेषकांचे, निधी व्यवस्थापकांचे रोजगार घटवू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यास असामान्य बुद्धिमत्तेची नव्हे, तर सर्वसामान्य परंतु मानवी घटक प्राधान्य असणारी हवी, हे अधोरेखित करते.

हेही वाचा :

Back to top button