नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवारीने ‘मनसे’ इच्छुकांची माघार? महायुतीचा पाळावा लागेल धर्म | पुढारी

नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवारीने 'मनसे' इच्छुकांची माघार? महायुतीचा पाळावा लागेल धर्म

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात सर्वाधिक अनिश्चितता निर्माण झालेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात अखेर महाविकास आघाडी अन् महायुतीच्या उमेदवारांवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांचे नाव निश्चित केले असून, महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे नुकतेच महायुतीत सहभागी झालेल्या व नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा करणाऱ्या मनसेतील इच्छुकांनी आपल्या तलवारी मॅन केल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडावी यावरून सेना-भाजप आमनेसामने आले होते. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह थेट ठाणे गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या देत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सागर बंगल्यावर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद दर्शविणारा अहवाल सादर केला. सेना-भाजपचा वाद सुरू असताना मनसेनेदेखील नाशिकच्या जागेवर दावा दाखल केला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीवारी केल्यापासून मनसेच्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला राहिला असून, येथून मनसेचाच उमेदवार द्यावा आणि स्वत: राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनी नाशिक लोकसभेची उमेदवारी करावी, अशी गळ कार्यकर्त्यांकडून घातली गेली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्याबाबतचे पत्रही मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पाठविले. त्यातच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांचे सत्र सुरू झाल्याने, मनसेतील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

अखेर या संपूर्ण नाट्यावर आता जवळपास पडदा पडला असून, महायुतीतून भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता असल्याने, मनसे इच्छुकांनी आपल्या तलवारी मॅन केल्याची माहिती पुढे येत आहे. आपण महायुतीचा घटक राहू शकतो, त्यामुळे महायुतीचा धर्म पाळावा यादृष्टीने आपली निवडणूकीतील भूमिका असेल, असे मत मनसेच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज साहेबांचा आदेश हा सर्वोत्तपरी असेल असेही या पदाधिकाऱ्याने न चुकता सांगितले आहे.

लोकसभेतून विधानसभेची मोर्चेबांधणी

मनसे महायुतीचा घटक आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट होणे असले तरी, लोकसभेसाठी मनसेला जागा न मिळाल्यास, विधानसभेसाठी मनसेकडून महायुतीकडे नाशिक शहरातील काही जागांवर दावा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेतील इच्छुकांनी लोकसभेएेवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आगामी निवडणूकांमध्ये मनसेची घौडदौड असेल असेही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button