देशातील 1 लाख लाभार्थ्यांना मिळणार सवलत कर्ज, पीएम मोदींच्या हस्ते होणार वाटप | पुढारी

देशातील 1 लाख लाभार्थ्यांना मिळणार सवलत कर्ज, पीएम मोदींच्या हस्ते होणार वाटप

धुळे : पुढारी वृत्तसेवा– केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बुधवार (दि. 13) रोजी देशातील 1 लाख लाभार्थ्यांना सवलत कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्यात.

या कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीस महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ अशा तीन महामंडळामार्फत देशातील एक लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे बुधवार 13 मार्च, 2024 रोजी दुपारी 4 वाजता राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदीर, पारोळा रोड, धुळे येथे सवलत कर्ज वाटप करण्यात येणार आहे. यात धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच काही लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचारानुसार कार्यक्रमाची सर्व व्यवस्था करावी. कार्यक्रमस्थळी योग्य आकाराचे एलईडी स्क्रीन लावावेत. हॉलमध्ये लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, ध्वनी, विद्युतची परिपुर्ण व्यवस्था करावी. कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांना कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी उपस्थित राहण्याचे नियोजन करावे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणारे लोकप्रतिनिधी, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी यांच्या वाहनासाठी पार्किगची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने कार्यक्रमस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. त्याचबरोबर बँकामार्फत कर्ज प्रकरणे मंजूर लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याचे नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button