Nashik | फेब्रुवारीअखेरीस कोणत्याही क्षणी आचार संहिता? | पुढारी

Nashik | फेब्रुवारीअखेरीस कोणत्याही क्षणी आचार संहिता?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी लोकसभा निवडणूकीच्या घोषणेवरुन उत्सुकता शिगेला पोहचली असताना राज्यात मंत्री व व्हीव्हीआयपींकडून विविध कार्यक्रमांसाठी २० तारखेपर्यंत वेळ दिली जात आहे. त्यानंतर आलेल्या कार्यक्रमांच्या निमंत्रणावर मंत्री फुली मारत आहेत. त्यामूळे एकुण परिस्थिती बघता २० तारखेनंतर कोणत्याही क्षणी निवडणूकीची आचारसंहिता लागू होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकीचा फिव्हर आहे. गेल्या दोन टर्मचा इतिहास बघता बघता मार्च महिन्यात निवडणूका घोषित होतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने बहुतेक पक्षांनी दोन ते तीनवेळेस मतदारसंघनिहाय जागांचा आढावा पूर्ण केला आहे. दुसरीकडे सामान्य जनतेमध्येही निवडणूकांच्या तारखांबद्दल दररोज नवनवीन आराखडे बांधले जात असताना फेब्रुवारीअखेरीस लोकसभेचा बिगूल वाजू शकताे. याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यात व्हीव्हीआयपी व मंत्र्यांचे वाढलेले दौरे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या १९ तारखेला मुंबई-पुणे-जळगावचा दौरा प्रस्तावित आहेत. या दाैऱ्यात मोदी हे विविध विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. त्याचधर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळांतील अन्य मंत्र्यांकडून १९ तारखेपूर्वीच विकासकामे व भुमिपुजन सोहळे आटोपून घेण्याकडे कल आहे. त्यानंतर मात्र विकासकामांचे लोकार्पण व भुमिपुजन तसेच अन्य कार्यक्रमांसाठी वेळ नाकारण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे विविध शासकीय विभागांनादेखील २० फेब्रुवारीनंतर कोणतेही महत्वपूर्ण सोहळे, कार्यक्रम नको, असा तोंडी फतवाच मंत्र्यांनी काढल्याचे कळते आहे. त्यामुळे एकुणच मंत्र्यांची तयारी बघता २० फेब्रुवारीनंतर कोणत्याही क्षणी निवडणूकांची घोषणा होण्याची चिन्हे आहेत.

प्रशासनाचा तयारी भर
सन २०१४ मध्ये देशात १८ मार्चला लोकसभा निवडणूका लागल्या होत्या. तर २०१९ ला आयोगाने १० मार्च रोजी निवडणूकांची घोषणा केली होती. त्यानूसार यंदा आणखीन अलीकडे म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्यात आयोग आचारसंहिता लागू करु शकते. हीच शक्यता गृहित धरुन जिल्हा प्रशासनाने तयारीवर भर दिला आहे.

Back to top button