धुळे शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारचा निधी मंजूर : खासदार डॉ. सुभाष भामरे | पुढारी

धुळे शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारचा निधी मंजूर : खासदार डॉ. सुभाष भामरे

धुळे : पुढारी वृत्तसेवा– धुळे शहराच्या सर्वागिण विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजनांसाठी निधी मंजूर झाला असून या निधीतून सिंचन, रस्ते, भूयारी गटारीची कामे प्रगतीत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसगी केले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या शहरी भागातील दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत दत्तमंदिर परिसरात आज झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, विकसित भारत संकल्प यात्रेचे नोडल ऑफिसर तथा मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त संगिता नांदुरकर, पल्लवी शिरसाठ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, तहसिलदार (संजय गाधी) श्री.पाटील, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी नगरसेवक अनिल नागमोते, भारती माळी, हिरामण अप्पा गवळी आदी उपस्थित होते.

खासदार डॉ.सुभाष भामरे म्हणाले की, धुळे शहराच्या सर्वागिण विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजनांसाठी अमृत 1 व अमृत 2 मध्ये निधी मंजूर झाल्याने शहरातील अनेक महत्वाचे प्रश्न यातुन सोडविले जात आहे. यापूर्वी धुळे शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी हे दहा बारा दिवसांनी मिळत होते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने अमृत एक योजनेमधून 162 कोटी रुपये पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी आणि भुयारी गटारीसाठी 150 कोटी मंजूर केले आहे आणि त्यानिधीच्या माध्यमातून जवळपास सर्व कामे पुर्ण झाली आहेत. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 700 कोटी आणि 150 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आज धुळे शहरासासाठी अक्कलपाडा योजनेमार्फत दोन दिवसांनी पाणी मिळत आहे. येणाऱ्या काळात एक दिवसाआड धुळेकरांना पाणी मिळणार आहे. आणि भविष्यात कधीही धुळे शहराला पाणी टंचाईची होणार नाही असे कामे झालीत आहेत. धुळे शहरातील 18 डीपी रस्त्यासाठी जवळपास 100 कोटी रुपये मंजूर झाले असून 15 डिपी रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच लहान रस्त्यासाठी जवळपास 100 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने 70 प्रकारच्या योजना सुरु केल्या आहेत. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून 2047 पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचा संकल्प आहे. शेवटच्या घटकातील नागरिक, महिला, शेतकरी, युवा यांचा सर्वागिण विकास झाला तरच विकसित भारत होण्याचा संकल्प पुर्ण होणार आहे. गरीबांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबविल्या आहे. या विविध योजनांचा लाभ गरीब, वंचित, दुर्बल घटकापर्यंत पोहचावा यासाठी या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 50 कोटी जनतेला आयुष्मान कार्ड देण्याचे उद्दिष्ट आहे. या कार्डच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत विविध आजारावर मोफत उपचार मिळणार आहे. धुळे शहरात जवळपास 91 हजार आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात अजूनही ज्या लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढलेले नाही, त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून ज्यांना हे कार्ड मिळाले नाही त्यांची नोंदणी करुन ते तयार करुन घ्यावेत. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास येाजना, पीएम स्वनिधी योजना, विश्वकर्मा योजना सारख्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतला नसेल त्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेची सुरवात आपल्या जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी झाली होती. आणि पहिल्या टप्प्यासाठी ग्रामीण भागात 5 व्हॅन उपलब्ध झाल्यात या व्हॅनमार्फत प्रत्येक गावागावात ही यात्रा सुरु आहे. आजपासून शहरीभागासाठी विकसित संकल्प भारत यात्रा सुरु होत आहे. आणि ही यात्रा धुळे शहरातील प्रत्येक वार्डात जाणार आहे. या व्हॅनच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यात येणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात परंतू त्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पेाहचत नाही. यासाठी ही यात्रा जिल्ह्यात सुरु झाली आहे. जेणेकरुन जे पात्र लाभार्थी विविध योजनांपासून वंचित आहेत त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. ही यात्रा जेव्हा शहरीभागातील प्रत्येक वार्डात येईल तेव्हा सर्व लाभार्थ्यांनी या योजनांची माहिती घेवून लाभ घ्यावा. विशेष करुन महानगरपालिका क्षेत्रात ज्या योजना राबविल्या जातात जसे प्रधानमंत्री आवास योजना, पीएमस्वनिधी योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना इत्यादी प्रकारच्या योजनांचा लाभ आपण घेवू शकणार आहे. तसेच स्वच्छता ही दैनंदिन जीवनात खुप महत्वाची असते धुळे शहर स्वच्छ राहण्यासाठी खूप काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातनू धुळेकरांना आवाहन करतो की, धुळे शहर स्वच्छ करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे, सार्वजनिक ठिकाणी कोणीही कचरा टाकू नयेत. सर्व नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करुन महापालिकेच्या कचरागाडीत कचरा टाकावा. जेणेकरुन आपला जिल्हा व आपले शहर स्वच्छ होऊ शकेल. तसेच स्वच्छ भारत अभियानाचा जो मुख्य उद्देश आहे तो पूर्ण होऊ शकेल. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने धुळे शहरातील सर्व नागरिकांनी स्वच्छ धुळेसाठी संकल्प करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महापालिका आयुक्त श्रीमती पाटील म्हणाल्या की, धुळे शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसऱ्या टप्पयास आज सुरुवात होत आहे. पुढील आठ दिवस धुळे शहरातील प्रत्येक वार्डात संकल्पयात्रेचा कार्यक्रम होणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये महापालिकेने सहभाग नोंदविला आहे. आणि शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचविण्याचा प्रयत्न केला असून पीएम स्वनिधीच्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त उद्दिष्ट महापालिकेने पुर्ण केले आहे. तसेच जवळपास 91 हजार लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, वैयक्तिक शौचालय योजना, आयुष्मान भारत कार्ड लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच यावेळी नागरिकांना विकसित भारत संकल्पनेची शपथ देण्यात आली. यावेळी मोठया संख्येने लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button