नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती  | पुढारी

नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजराने ‘जय श्रीराम’ नामाच्या जयघोषात काळाराम मंदिर परिसर दुमदुमून गेले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्या सोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, दिनकर पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त मंदार जानोरकर, शुभम मंत्री, धनंजय पुजारी यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष व मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

काळाराम मंदिरातील दर्शन व आरतीनंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारे राजकारणावर बोलणार नाही, असे सांगितले. आज रामसेवक, रामभक्त म्हणून आलो आहे. केंद्र व राज्यातील सरकाराने केलेली कामे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे बळ मागितल्याचे त्यांनी सांगितले. काळाराम मंदिर हे पावन स्थळ असून, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साने गुरुजी यांचा इतिहास आहे. समाजाच्या कल्याणाकरता जाती-पातीचे भेद मिटविण्याकरता आमचा संघर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गॅरंटी एवढी मोठी आहे की धार्मिक विषयाचे राजकारण करून मते घेण्याची आम्हाला गरज नाही, असा दावा त्यांनी केला. अयोध्येत होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्याविषयी जे जे राजकारण करतील त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ आहे. आम्ही राष्ट्रहिताकरिता व महाराष्ट्राचे कल्याणासाठी काम करणारे लोक आहोत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button