मनसेच्या राजगडावर उपाध्यक्षाला मारहाण

मनसेच्या राजगडावर उपाध्यक्षाला मारहाण

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांच्यावर मंगळवारी मुंबईत मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगडमध्येच हल्ला झाला. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या समोरच झालेल्या या हल्ल्यात महेश जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खारघरच्या भारती मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाधव यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मारहाण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कळंबोलीतील माथाडी कामगारांचे प्रश्न घेऊन महेश जाधव मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भेटीस गेले होते. मनसे कार्यालय राजगड येथे अमित यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान महेश जाधव आणि अन्य मनसे नेत्यांमध्ये खडाजंगी झाली आणि त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले.
अमित ठाकरे यांच्यासह बैठकीत उपस्थित ठेकेदाराच्या माणसांनी जीवघेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला. महेश जाधव यांनी स्वतः फेसबुक लाईव्ह करत या मारहाणीची माहिती दिली. मारहाणीत स्वतः अमित ठाकरे देखील सहभागी झाल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत मी मरे पर्यत माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणार असल्याचे महेश जाधव यांनी जाहीर केले.

दलालीचा आरोप

मी राजगडावर मराठी कामगारांची बाजू घेतल्याने अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. एक परप्रांतीय ठेकेदार विनायक अग्रवाल साठी मला मारहाण केली. हे ठाकरे आहेत की गुंड? राज ठाकरेंनी दलालीचा पक्ष उघडला आहे. त्याचा पोरगा बसून खंडणी गोळा करतो. उद्या माझे काही बरेवाईट झाल्यास त्यास राज आणि अमित ठाकरे जबाबदार असतील असा इशाराही महेश जाधव यांनी दिला.

महेश जाधव यांच्या या आरोपा नंतर मनसे कार्यकर्त्यांनी महेश जाधव यांच्या कामोठे येथील कार्यालयात जावून तोडफोड केली. जाधव यांना पाहण्यासाठी माथाडी कामगार वर्ग मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये जमले होते. याच वेळी मनसे कार्यकर्ते देखील हॉस्पिटल परिसरात जाब विचारण्यासाठी गेले असता, माथाडी कामगारांनी या मनसे कार्याकर्त्याना खारघर मध्ये पाठलाग करत मारहाण केली आणि त्यातून मनसेचे दोन गट अक्षशः एकमेकंविरूध्द उभे ठाकले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news