तडका : निवृत्तीचे वय काय? | पुढारी

तडका : निवृत्तीचे वय काय?

सर्वसाधारणतः सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय 58 असे आहे. काही विशिष्ट क्षेत्रामधील अनुभवी लोकांचा फायदा घेण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय 60 किंवा क्वचित 62 वर्षांपर्यंत वाढवलेले आहे. प्राध्यापक साधारणतः साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतात. न्यायमूर्ती 62 किंवा 65 वयोमान पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त होतात. आता प्रश्न असा उभा राहतो, की अशी कुठलीही नोकरी नसणार्‍या लोकांनी नेमके केव्हा निवृत्त झाले पाहिजे?

समाजातील कुटुंबांचा विचार केला तर मुलगा हाताशी आला, की घरातील कुटुंब प्रमुखाने मागची सीट पकडून त्याला मार्गदर्शन करावे आणि भविष्यासाठी त्याच्या पाठीशी उभे राहावे, असे अपेक्षित असते. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. शेती किंवा उद्योग करणारे बापलेक असतील, तर मुलगा हाताशी आला, त्याचे लग्न झाले आणि त्याला मुले झाली, तरी बाप आपल्या हातातील कंट्रोल सोडायला तयार नसतो. एक किंवा दोन मुलांची लग्ने होऊन घरामध्ये सुना नांदण्यास आल्या, तरी सासूबाई स्वयंपाकघराचे कंट्रोल सोडण्यास तयार नसतात. महिलांच्या कर्तृत्वाची व्याप्ती मोठी असल्यामुळे सदरील सासूबाई या फक्त स्वयंपाकघर नव्हे, तर स्वतःचा नवरा आणि सगळे कुटुंबच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी कुणीही निवृत्त होण्याचा विषय येत नाही. मग त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ठरणार कसे?

नुकत्याच एका राजकीय पक्षाच्या नेत्याने एक विधान केल्यामुळे सर्वत्र गदारोळ माजला आहे, हे आपण पहात आहोत. या ठिकाणी कथेच्या केंद्रस्थानी एक पुतणे आहेत आणि त्यांनी आपली आजवरची राजकीय वाटचाल काकांच्या छत्रछायेखाली आणि काकांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच केली आहे. आपल्या आयुष्याची जवळपास 40 वर्षांची राजकीय कारकीर्द ज्या काकांच्या सूचनेप्रमाणे होत गेली, त्या काकांचे वयसुद्धा आता 84 पेक्षा जास्त झाले आहे. शिवाय काकांना पुतण्यापेक्षा प्रिय अशी स्वतःची कन्या आहे. त्यामुळे आपला राजकीय वारसदार कोण? पुतण्या की कन्या, हा काकांचा गोंधळ कधी संपणार नव्हता.

संबंधित बातम्या

या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या पुतण्याने शेवटी ‘आता तुमचे वय झाले तुम्ही घरी बसा,’ असा सल्ला वयोवृद्ध काकांना दिला आहे. थकलेले असले तरी काकांचे चाहते आणि कट्टर कार्यकर्ते सर्वत्र आहेत. त्यांनी लगेच सदरहू पुतण्याला ‘बाप कधीच रिटायर होत नसतो,’ वगैरे नाट्यमय संवाद ऐकवले. बंडखोरीचा जन्म अस्वस्थतेतून होत असतो. बदललेला काळ मान्य करण्यास बापाने नकार दिला, तर पोरगा आपले स्वतःचे वेगळे बस्तान बसवतो आणि आपले निर्णय आपणच घ्यायला सुरुवात करतो. वर्षानुवर्षे हे असेच घडत आले आहे आणि घडत राहणार आहे. थकलेला बाप माघार घ्यायला तयार नसतो आणि जोश असलेला पोरगा पुढे जाण्यासाठी इच्छुक असतो. 84 वय झाले तरी काका माघार घ्यायला तयार नाहीत, हे पाहून पुतण्या उद्विग्न झाला आणि त्याने स्वतःची वेगळी वाट तयार करून स्वतःची वाटचाल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राजकारणात हा प्रश्न उभा राहिला की निवृत्तीचे वय नेमके किती असले पाहिजे?

Back to top button